तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा अन् भाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे मालवण येथील कै. शिवाजी देसाई (वय ६६ वर्षे) !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभारमाठ, मालवण येथील सनातनचे साधक शिवाजी गोविंद देसाई (वय ६६ वर्षे) यांचे ५.१०.२०२४ या दिवशी निधन झाले. १६.१०.२०२४ या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त मालवण केंद्रातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्री. दिनानाथ गावडे, चौके
१ अ. सर्व सेवा सकारात्मकतेने स्वीकारून त्या तळमळीने पूर्ण करणे : ‘देसाईकाका नेहमी सकारात्मक असायचे. त्यांना एखादी सेवा दिली आणि ती त्यांच्या क्षमतेपेक्षाही अधिक असली, तरी ते सेवा स्वीकारायचे अन् पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. गुरुपौर्णिमेच्या काळात त्यांच्याकडे ४ – ५ सेवा असायच्या. त्या सर्व सेवा आनंदाने स्वीकारून ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचे. काका केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवण्याचे दायित्व घेऊन उपक्रम चांगले होण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यांच्या तळमळीमुळे उपक्रम चांगले होऊन जिल्ह्यातही त्यांची नोंद घेतली जायची.
१ आ. प्रेमभाव आणि सहसाधकांच्या साधनेची तळमळ : सेवेला येतांना देसाईकाका सर्व साधकांसाठी खाऊ घेऊन यायचे. ‘साधकांची साधना चांगली व्हावी आणि त्यांची प्रगती व्हावी’, याची त्यांना तळमळ होती. काका स्वतः पाठपुरावा करून साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायचा प्रयत्न करायचे.
१ इ. अडखळत बोलण्याचा न्यूनगंड न बाळगता सर्वांना साधना सांगणे : देसाईकाका अडखळत बोलायचे; पण त्यांना सेवेची संधी मिळाली की, ते ‘स्वतःला व्यवस्थित बोलता येत नाही’, असा न्यूनगंड न बाळगता सर्वांना साधनेविषयी सांगायचे आणि प्रवचनही घ्यायचे.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना समाजापर्यंत पोचावी, अशी तळमळ असणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोचावी आणि साधनेचा प्रसार व्हावा’, अशी काकांच्या मनात तीव्र तळमळ असायची. यासाठी ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांची अधिक मागणी करून स्वतः त्यांचे वितरण करायचे आणि इतर साधकांकडूनही वितरण करून घ्यायचे.
२. श्री. हेमंत धुरी
२ अ. ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा’ यांची सांगड घालणारा कै. देसाईकाकांचा दिनक्रम ! : ‘कै. देसाईकाका प्रतिदिन सकाळी लवकर उठून पूजेसाठी फुले घेऊन यायचे. त्यानंतर ते त्यांच्या आईची सेवा करायचे. आईची सेवा झाल्यावर ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण, तसेच अन्य सेवा करण्यासाठी जायचे. दिवसभरात नामजपादी उपाय करायचे राहिल्यास ते पूर्ण करूनच ते रात्री झोपायचे. ते मलाही नामजपादी उपाय करण्याची आठवण करून द्यायचे.
२ आ. इतरांचा विचार करणे : मध्यंतरी माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा देसाईकाकांनी काही काळ मला त्यांच्या दुकानात काम दिले. मला कधी मानसिक ताण आल्यावर मी त्यांच्याशी बोलायचो. तेव्हा ते मला नामजपादी उपाय करायला सांगायचे, तसेच ‘कोणत्या स्वभावदोषांमुळे असे होत आहे’, याचा अभ्यास करायला सांगून त्यांची जाणीवही करून द्यायचे.’
३. श्री. राजन सकपाळ
३ अ. तत्परता : ‘देसाईकाका कुठलीही सेवा तत्परतेने करायचे.
३ आ. नियोजनकौशल्य असणे : कितीही अडचणी आल्या, तरी ‘प्रत्येक सेवा माझ्या गुरूंची आहे’, याची जाणीव ठेवून देसाईकाका भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करायचे. विशेष उपक्रम राबवतांना ते ‘कोणत्या साधकांना सेवेसाठी बोलवायला हवे ?’, याचा विचार करून साधकांच्या सेवेचे व्यवस्थित नियोजन करून सेवा पूर्ण करायचे.’
४. सौ. राजश्री सकपाळ
४ अ. स्वतःच्या त्रासाविषयी आपणहून न सांगणे : ‘देसाईकाकांना कधी कधी शारीरिक त्रास व्हायचे. तेव्हा त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना ‘काकांना त्रास होत आहे’, हे जाणवायचे; पण ते स्वतःहून कधीच कुणाला त्रासांविषयी सांगायचे नाहीत.
४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असणे : देसाईकाका पुष्कळ साधे आणि सरळ स्वभावाचे होते. प्रत्येक गोष्टीकडे ते सकारात्मक दृष्टीकोनातून बघायचे. ‘आपण आपल्या परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून जमेल तशी सेवा करत रहायची’, असे ते सांगायचे. ‘जी सेवा मिळाली आली आहे, ती परात्पर गुरुदेवच करून घेणार आहेत’, असा भाव ठेवून ते सेवा करायचे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक (११.१०.२०२४))