मिरज येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ४९ गोवंशियांची सुटका !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु एकता आंदोलनाच्या हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार !
मिरज (जिल्हा सांगली), १५ ऑक्टोबर (वार्ता.) – १३ ऑक्टोबरच्या रात्री येथे एम्.एच्.१०-डब्ल्यू २६७० या विनापरवाना वाहतूक करणार्या टेंपोमधून ४९ लहान गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक होत होती. याची माहिती मिळाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु एकता आंदोलन यांच्या हिंदुत्वनिष्ठांनी पाठलाग करून हे वाहन पकडले. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात नेऊन गोवंशियांची सुटका केली. (जी माहिती गोवंशियांना मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) टेंपो वाहनात कोंडून गोवंश ठेवल्याने यातील ३ गोवंशियांचा गुदमरून मृत्यू झाला.
सर्व गोवंशीय कराड येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते वाहनाचा पाठलाग करत असतांना वाहनचालक आणि त्याच्यासमवेत असणारा दुचाकीचालक वाहन सोडून पसार झाले आहेत. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विनायक माईणकर, सोमनाथ गोटखिंडे, कृष्णा नायडू, किरण माळी, कुमार पवार, रवी कोरे, शुभम कट्टीकर, प्रमोद चिवटे, सुरेश फुटाणे, सुभाष टवकारे, विनायक गौड आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल ! |