वागणे, बोलणे आणि प्रत्येक कृती यांमधून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव व्यक्त होत असलेले पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !
पू. शिवाजी वटकर यांच्याबद्दल काहीतरी लेख लिहावा, असे मला काही वर्षे वाटत होते; पण ते देवदला आणि मी रामनाथीला असल्यामुळे मी लेख लिहू शकलो नाही. एका अर्थी ते बरेच झाले; कारण वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांच्या इतका चांगला लेख मला लिहिता आला नसता. त्यांच्या या अप्रतिम लेखाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !
__________________________________
पू. शिवाजी वटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कितीही दिल्या, तरी त्या थोड्याच होतील, एवढे त्यांचे कार्य अप्रतिम आहे. सनातन संस्थेमध्ये पू. वटकर यांच्यासारखे संत असल्यामुळे मला ‘सनातनचे कार्य भविष्यकाळात कसे असेल’, याची अजिबात काळजी वाटत नाही. याबद्दल मला वाटत असलेले विचार मी व्यक्त करू शकत नाही. धन्यवाद !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आज १६.१०.२०२४ (आश्विन शुक्ल चतुर्दशी) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा ७८ वा वाढदिवस आहे. ‘मी सनातन संस्थेत आल्यापासून माझा पू. शिवाजी वटकरकाकांशी संपर्क आहे. वर्ष २०१२ मध्ये मी देवद, पनवेल येथील आश्रमात रहाण्यास आले आणि त्यांच्याशी माझा जवळून संपर्क आला. ‘संत होण्यापूर्वी आणि संत झाल्यानंतर’ पू. वटकरकाका कसे आहेत ?’, हे मला जवळून अभ्यासायला मिळाले. खरेतर ‘संतांच्या अंतरंगातील साधनेचा प्रवास कसा असतो ?’, हे समजणे माझ्यासारख्या सामान्य जिवाला अशक्य आहे; परंतु पू. काका साधना आणि अध्यात्म यांविषयी मनमोकळेपणाने अन् आत्मीयतेने सर्वांशी बोलतात. त्यामुळे मला पुष्कळ शिकायला मिळते. गुरुदेवांच्या कृपेमुळे पू. वटकरकाकांकडून जे शिकता आले, ते गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
पू. शिवाजी वटकर यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. संतपद गाठल्यावर आणि वय झाल्यानंतरही व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य ठेवणारे पू. वटकरकाका !
पू. काका पूर्वीपासूनच पहाटे लवकर उठून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात. ते संत असूनही ‘नामजपादी उपाय करणे, प्रतिदिन स्वभावदोष निर्मूलन सारणीत चुका लिहिणे, स्वयंसूचना घेणे, गुणवृद्धीचे आणि भावजागृतीचे प्रयत्न करणे’, इत्यादी कृती सातत्याने करत आहेत.
ते प्रत्येक आठवड्याला ‘संतांच्या व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगा’त स्वतःकडून झालेल्या चुका ‘आत्मनिवेदन’ या भावाने सांगतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाण, साधकांसाठीच्या सूचना, आध्यात्मिक ग्रंथ इत्यादींमधील व्यष्टी साधनेविषयीच्या सूत्रांचा अभ्यास करतात. त्यानुसार स्वतः प्रयोग करून शिकलेले आणि अनुभवलेले साधनेचे प्रयत्न सहसाधकांनाही सांगतात.
२. चुकांविषयी गांभीर्य आणि संवेदनशीलता असणे
पू. काकांना स्वतःकडून झालेल्या चुका अन्य साधकांना सांगायला कमीपणा वाटत नाही. एखादी सेवा केल्यावर किंवा एखादा प्रसंग घडल्यावर ते स्वतःच्या चुका प्रांजळपणे आणि मोकळेपणाने संबंधित साधकांना सांगतात. ‘मी एक सामान्य साधक आहे, माझ्याकडून पुष्कळ चुका होतात’, असा त्यांचा भाव असतो. ते शिकण्याच्या स्थितीत राहून सहसाधकांना स्वतःच्या चुका सहजपणे विचारतात. ‘एवढे लहान होऊन चुका विचारणे केवळ संतांनाच जमू शकते’, असे त्यांच्या कृतीतून मला जाणवले. पू. काकांकडून चूक झाल्यास त्यांना पुष्कळ खंत वाटून पश्चात्ताप होतो.
३. साधकांची साधना आणि गुरुकार्य यांविषयी तळमळ
३ अ. ‘साधनेची हानी होऊ नये’, या हेतूने साधकांना तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे : पू. काका साहाय्य करण्याच्या दृष्टीने साधकांचे निरीक्षण करतात आणि लक्षात आलेल्या त्यांच्या चुका सहजतेने अन् तत्त्वनिष्ठतेने सांगतात. ‘चुका झाल्यामुळे साधकांना पाप लागू नये, तसेच साधकांची साधना आणि गुरुकार्य यांची हानी होऊ नये’, असा त्यांचा भाव असतो.
३ आ. साधकांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका सांगणे : पू. काकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना काही चुका लक्षात येतात. लिखाण, शुद्धलेखन, व्याकरण, संकलन किंवा छायाचित्रे यांविषयीच्या या चुका असतात. मागील ५ वर्षांपासून ते दैनिकाशी संबंधित सेवा करणार्या साधकांना या चुका सांगत आहेत. चुका सांगतांना त्यांच्यात कुठेही अहंभाव जाणवत नाही. ते सतत शिकण्याच्या स्थितीत राहूनच चुका सांगतात. अशा अहंशून्य संतांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
४. कौटुंबिक समस्यांकडे साक्षीभावाने पहाणे आणि मायेतील गोष्टींचा त्याग करून आश्रमात रहातांना ‘आश्रमातील साधकच खरे कुटुंबीय आहेत’, असा भाव असणे
पू. काकांना काही गंभीर कौटुंबिक समस्या आहेत. त्यांच्याकडे ते साक्षीभावाने पहातात. ते कुटुंबियांना आवश्यक ते सर्व साहाय्य करतात; परंतु त्यांच्यामध्ये अडकत नाहीत. ‘गुरुदेवच कुटुंबियांची काळजी घेत आहेत’, असा त्यांचा भाव असतो. आश्रमापासून एक घंट्याच्या अंतरावर मुंबई येथे त्यांचे कुटुंबीय, बंगला आणि सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. असे असूनही ते पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद, पनवेल येथील आश्रमात मागील १४ वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या मनात कधी घरी जाण्याचा विचारही येत नाही. ‘आश्रमातील साधकच माझे खरे कुटुंबीय आहेत. मला त्यांच्या साधनेसाठी वेळ दिला पाहिजे. ‘साधकांना साहाय्य करणे’, हीच गुरुसेवा आहे’, असा त्यांचा भाव असतो.
५. गुरुदेवांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून वैशिष्ट्यपूर्ण लिखाणातून गुरुदेवांना अपेक्षित अशी समष्टी सेवा करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०२१ मध्ये पू. काकांना म्हटले होते, ‘‘तुम्हाला एवढे छान आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण कसे काय येते ? तुमची प्रतिभा जागृत झालेली आहे.’’ त्यावर पू. काकांनी गुरुदेवांना सांगितले, ‘‘तुम्हीच माझ्याकडून आरंभापासून टप्प्याटप्प्याने लिखाण करवून घेत आहात. तुमच्यामुळेच सर्व होत आहे.’’
अ. आरंभी पू. काका सनातन संस्थेचे सत्संग, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य, अध्यात्म अन् साधना यांविषयीचे लिखाण करायचे.
आ. हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करत असतांना पू. काका प्रत्येक मोहिमेची बातमी करून देत. जनजागृती होण्यासाठी आणि साधक अन् धर्माभिमानी यांना मोहिमेत सहभागी करवून घेण्यासाठी ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून लिखाण करत. त्यामुळे त्यांनी राबवलेल्या मोहिमांना उत्तम प्रतिसाद मिळून यशही मिळत असे.
इ. पू. काका त्यांच्या संपर्कात येणारे साधक, संत आणि समाजातील लोक यांच्याकडून ‘शिकायला मिळालेली सूत्रे अन् जाणवलेली गुणवैशिष्ट्ये’ लिहून देतात. त्यामुळे वाचक, साधक आणि समाजातील लोक यांनाही त्यातून शिकता येते, तसेच साधना अन् सेवा करण्यास प्रेरणा मिळते. गुणवैशिष्ट्ये लिहितांना ते संबंधित साधकाशी अनौपचारिकपणे बोलतात, त्याच्या मनाची विचारप्रक्रिया समजून घेतात आणि नंतर शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देतात. यातून ‘वस्तूनिष्ठ आणि योग्य ती सर्व सूत्रे सर्वांपर्यंत पोचावीत’, असा त्यांचा प्रयत्न असतो.
ई. वर्ष १९८९ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेली प्रवचने, सत्संग, जाहीर सभा, तसेच अनौपचारिक भेटी यांतून शिकायला मिळालेली सूत्रे पू. काकांनी तपशीलवार लिहून दिली आहेत. त्याचप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज, प.पू. काणे महाराज, प.पू. जोशीबाबा इत्यादी संतांच्या सत्संगात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूतीही लिहून दिल्या आहेत.
पू. काका सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे ‘ते सर्वांकडून शिकतात’, असे लक्षात येते.’ ‘शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिलेले गुरुदेवांना आवडते’, या विचाराने ते गुरुदेवांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतात.
पू. काकांची लिखाणातील प्रगल्भता पाहून ‘गुरुदेव पू. काकांकडून समष्टी सेवा करवून घेत आहेत’, असे लक्षात येते.
६. उतारवयातही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘समष्टी सेवा कशी करता येते ?’, याचा आदर्श सर्वांपुढे उभा करणे
उतारवयातही पू. काका आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून टंकलेखन आणि संकलन सेवा करत आहेत. ते संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने प.पू. भक्तराज महाराज आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सुवचने सिद्ध करतात. मागील २ वर्षांपासून ते प्रतिदिन पहाटे २०० पेक्षा अधिक साधक अन् जिज्ञासू यांना ‘व्हॉट्सॲप’द्वारे ती पाठवतात. ही सुवचने ते त्यांच्या ‘व्हॉटस्ॲप’च्या ‘स्टेटस्’वर ठेवतात. (‘व्हॉटस्ॲप स्टेटस्’ – अद्ययावत् माहिती, छायाचित्रे किंवा चलत्चित्रे इत्यादी ठेवण्याची सुविधा) त्यामुळे शेकडो साधक आणि जिज्ञासू (अनुमाने २५०० जण) यांना रामप्रहरी उच्च कोटीच्या संतांच्या छायाचित्रांचे दर्शन घडते आणि चैतन्यमय सुवचने वाचायला मिळतात.
सदैव मजवरी गुरुकृपा असू द्यावी, एवढीच माझी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
संकटकाळात तुम्ही (टीप) माझे रक्षण करावे, ही नसे माझी इच्छा।
संकटकाळातही निर्भय होऊनी, साधना करवून घ्यावी, हीच माझी प्रार्थना !।। १।।
माझ्या दु:खी-कष्टी मनाचे तुम्ही सांत्वन करावे, ही नसे माझी इच्छा।
निश्चल मनाने परिस्थिती स्वीकारण्या प्रोत्साहन द्यावे, हीच माझी प्रार्थना !।। २।।
अडचणींमध्ये तुम्ही धावून यावे, साहाय्य करावे, ही नसे माझी इच्छा।
अडचणींवर मात करण्यास मजसी आत्मबळ द्यावे, हीच माझी प्रार्थना !।। ३।।
माझ्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय द्यावा, ही नसे माझी इच्छा।
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, यावरील श्रद्धा न ढळावी, एवढीच माझी प्रार्थना !।। ४।।
कुणी मला विनाकारण त्रास अन् दुःख देऊ नये, ही नसे माझी इच्छा।
प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी माझे मन खंबीर करावे, एवढीच माझी प्रार्थना !।। ५।।
मायेतील अडचणी सोडवून मला सुखी करावे, ही नसे माझी इच्छा।
तुमचे नाम माझ्या मुखात सतत राहू द्या, एवढीच माझी प्रार्थना !।। ६।।
कोणतेही पद, सत्ता, संपत्ती मिळावी, ही नसे माझी इच्छा।
तुमच्या चरणांचा दास होऊन रहावे, एवढीच माझी प्रार्थना !।। ७।।
मला कुणी कर्तेपणा देऊन कौतुक करावे, ही नसे माझी इच्छा।
तुम्हीच कर्ता-करविता आहात, याची जाणीव रहावी, एवढीच माझी प्रार्थना !।। ८।।
मला हवे ते मिळावे अन् तुम्ही ते सर्व द्यावे, ही नसे माझी इच्छा।
गुरुचरणांची धूळ म्हणून चरणी ठेवावे, एवढीच माझी प्रार्थना !।। ९।।
मी मायेतील मागितले, तर तुम्ही ते देऊ नये, एवढीच माझी इच्छा।
सदैव मजवरी गुरुकृपा असू द्यावी, एवढीच माझी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !।। १०।।
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– (पू.) शिवाजी वटकर (१८.४.२०२४)
७. पू. काकांचे साधकांवर असलेले प्रेम
७ अ. साधकांची पुष्कळ प्रेमाने विचारपूस करणे : पू. काका साधकांची पुष्कळ प्रेमाने विचारपूस करतात. स्वतःकडे असलेला खाऊ त्यांना प्रेमाने देतात. साधकांना खाऊ दिल्यानंतर पू. काकांनाच पुष्कळ आनंद होतो. साधक त्यांच्या संपर्कात येतात. तेव्हा ते साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची स्थिती जाणून घेतात. साधक पू. काकांशी मनमोकळेपणाने बोलतात आणि त्यांना साधनेतील अडचणी सांगतात. पू. काकांना ‘गुरुदेवांचा प्रत्येक साधक साधनेच्या पुढच्या टप्प्यात जावा’, अशी तळमळ असते.
७ आ. महाप्रसाद घेतांना साधकांशी सहजतेने बोलून त्यांना साधनेत साहाय्य करणे : पू. काका महाप्रसाद घेतांना वेगवेगळ्या साधकांसमवेत बसतात. ते साधकांशी सहजतेने अनौपचारिक बोलणे चालू करतात. ते साधकांच्या स्थितीनुसार त्यांना
प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले इत्यादी संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती सांगतात. ते साधकांना प्रेमाने साधनेविषयीची सूत्रे समजून सांगतात. साधकाला काही त्रास असेल किंवा अडचण असेल, तर ते स्वतःहून साहाय्य करतात. ‘साधक सकारात्मक आणि आनंदी कसा होईल ?’, हे ते पहातात. पू. काकांशी बोलल्यामुळे साधकांना साधनेचे प्रयत्न करण्यामध्ये पुष्कळ साहाय्य होते.
८. भाव
८ अ. साधकांप्रती भाव : ‘सनातनचे सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांना प्राणप्रिय आहेत. त्यामुळे प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पाहून त्याच्याशी नम्रतेने, प्रेमाने आणि आत्मीयतेने वागले पाहिजे’, असे पू. काका सर्वांना सांगतात. ‘साधक किती कठीण परिस्थितीत आणि समर्पणभावाने साधना करत आहेत अन् साधकांची गुरुदेवांवर किती श्रद्धा आहे ?’, हे पाहून पू. काकांचा भाव जागृत होतो.
८ आ. साहाय्य करणार्या साधकांप्रती कृतज्ञताभाव : जे साधक पू. काकांना साहाय्य करतात, त्यांच्याप्रती आणि अन्य साधकांप्रतीही त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘साधक उपचार करतात; म्हणून मी उभा आहे’, असा त्यांचा भाव आहे.
८ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यसाधारण निष्ठा आणि भाव असणे : ‘सर्व काही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसाठी आणि गुरुदेवांचेच आहे’, असे पू. काका सतत सांगतात. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, लिखाणातून आणि प्रत्येक कृतीतून गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव प्रकट होत असतो. त्यांच्या जीवनात अनेक संत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आल्या; पण पू. काकांचा गुरुदेवांप्रतीचा भाव अन् श्रद्धा तसूभरही ढळली नाही. ‘गुरुदेवांच्या चरणी शरण जाणे, गुरुदेवांचे सतत स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’, हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे’, असे पू. काका सांगतात आणि स्वतः तसे प्रयत्न करतात.
९. ‘नियमित व्यायाम आणि संतुलित आहार’ यांद्वारे प्रकृतीची काळजी घेणे
पू. काकांना पाठदुखीचा त्रास आहे, तसेच पूर्वी त्यांच्या हृदयाच्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना खाण्याचे पथ्यही आहे. ‘साधनेसाठी प्रकृती चांगली रहायला हवी’, यासाठी पू. काका खाण्यावर पुष्कळ नियंत्रण ठेवतात. त्यांचा आहार मोजकाच असतो. एखादा पदार्थ चांगला झाला, तरी ते तो अधिक प्रमाणात ग्रहण करत नाहीत. ‘नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे’, हे त्यांची प्रकृती चांगली असल्याचे गमक आहे.
पू. काका करत असलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न सर्वांनाच प्रेरणादायी आहेत. कलियुगात संतांचा सतत सत्संग देऊन त्यांना जवळून अनुभवायला दिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
पू. काकांमध्ये साधक, संत आणि गुरुदेव यांच्या प्रती असणार्या भावाचे वर्णन करणे कठीण आहे. ‘त्यांच्यासारखा भाव आम्हा सर्व साधकांमध्ये येऊ दे आणि त्यांच्याकडून मला सतत शिकता येऊ दे’, अशी प.पू. गुरुदेव अन् पू. काका यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद, पनवेल. (६.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |