‘महावाचन उत्सवा’त राज्यातील १ कोटी मुले सहभागी होतील ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री
मंत्रालयामध्ये ‘मराठी भाषा वाचन प्रेरणा दिन’ साजरा !
मुंबई – जो सर्वाधिक वाचन करतो, तो सर्वोत्कृष्ट बनतो. मुलांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढीस लागावी, यासाठी शासनाने वाचन चळवळ चालू केली आहे. मागील वर्षी ‘महावाचन उत्सवा’मध्ये ५१ लाख मुले सहभागी झाली होती. यावर्षी या उत्सवामध्ये १ कोटी मुले सहभागी होतील, असे वक्तव्य मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त १५ ऑक्टोबर या दिवशी मराठी भाषा विभागाद्वारे मंत्रालयात मराठी भाषा वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
या वेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अवर सचिव उर्मिला धारवड यांसह मराठी भाषा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘मराठीमध्ये साहित्य, संशोधन करण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे एकाच छताखाली मराठी भाषेची सर्व कार्यालये आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. साहित्यिक हे राज्याचे वैभव असल्याने त्यांची मुंबईत कामानिमित्त आल्यास या इमारतीमध्ये रहाण्याची सोय करण्यात येणार आहे. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘पुस्तकांचे गाव’ संकल्पना राबवली. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे एक गाव करण्याचाही शासनाचा विचार आहे. विश्वकोष निर्माते लक्ष्मणशास्त्री यांचे वाई (जिल्हा सातारा) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.’’
मराठी पुस्तकांना चांगला प्रतिसाद
मराठी भाषा प्रेरणा दिनानिमित्त मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात १५ आणि १६ ऑक्टोबर हे २ दिवस मराठी भाषा विभागाद्वारे मराठी भाषेच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली विविध साहित्य, शब्दकोष, इतिहास आदी विविध पुस्तक प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. अनेक वाचनप्रेमींनी या पुस्तकांची खरेदी केली.
संपादकीय भुमिकाजीवनाचा अनुभव समृद्ध करणार्या साहित्याची निर्मिती होण्यासाठी साहित्यिकांनी प्रेरित झाले पाहिजे ! |