संपादकीय : भारतविरोधी कॅनडा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (डावीकडे) व भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या वर्ष २०२३ मध्ये झालेल्या हत्येमध्ये कॅनडामधील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि अन्य अधिकारी सहभागी असल्याचा जुना आरोप पुन्हा एकदा कॅनडाने थेट मुत्सद्दी चर्चेत केला. विशेष म्हणजे आजतागायत कॅनडा याविषयी कुठलेही पुरावे देऊ शकलेला नाही. आता मात्र भारताने आरोपावर केवळ प्रत्युत्तर देत न बसता तेवढीच थेट कृती केली. कॅनडाच्या आरोपांना विरोध करत देहलीतील त्यांच्या उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि आणि अन्य अधिकारी यांना परत बोलावले. गेल्या काही दिवसांत भारत त्याच्या शत्रूदेशांच्या संदर्भात जे काही रोखठोक निर्णय घेऊन थोडा का होईना कणखरपणा दाखवत आहे, त्याचाच हा पुढचा भाग आहे.

कॅनडामध्ये हिंदूंच्या मतपेढीचा प्रभाव का नाही ?

कॅनडात ८ लाख २५ सहस्र हिंदू आहेत आणि ७ लाख ७५ सहस्र शीख आहेत. या शिखांना न दुखावण्यासाठी कॅनडा राजकीय लाभासाठी खलिस्तानवाद्यांचे समर्थन करत आहे आणि त्यासाठी भारताशी वैर धरत आहे. ज्या अर्थी कॅनडा हे करत आहे, त्या अर्थी कॅनडामध्ये खलिस्तानसमर्थक शीखच बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील बहुसंख्य शिखांनी खलिस्तानप्रेमी होणे, हे एक मोठे दुर्दैव आहे. ‘कॅनडाने भारतप्रेमी शीख समुदाय आणि खलिस्तानप्रेमी शीख यांत भेद केला पाहिजे’, हे कॅनडातील भारतप्रेमी शिखांनी अन् भारतातील उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांनी कॅनडा सरकारला वारंवार स्पष्ट केले पाहिजे. खलिस्तानच्या समर्थकांसाठी कॅनडा तेथील हिंदूंशीही वैर धरत आहे. प्रत्यक्षात हे हिंदू २-३ पिढ्यांपासून तिथे आहेत आणि अमेरिकेप्रमाणेच तेथील देशाच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. खरेतर शिखांप्रमाणे मतांसाठी या हिंदूंचाही आदर कॅनडाला करावासा वाटत नाही; याचे कारण म्हणजे शक्तीशाली देशांपैकी एक असलेला कॅनडा हा जगातील डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेला, एक प्रकारे हिंदुविरोधी देश आहे.

जुलै २०२४ मध्ये तेथील इस्कॉनच्या मंदिराची खलिस्तान्यांनी तोडफोड केल्यावर तेथील भारतीय वंशाचे खासदार आर्य चंद्रा यांनी आवाज उठवला. त्यावर खलिस्तानी प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने त्यांनाच उलट धमकी दिली. त्यावर त्यांना कॅनडामधील हिंदूंचे देशाच्या जडणघडणीत असलेले योगदान सार्वजनिकरित्या सांगावे लागले. ‘जसा भारतात हिंदूंच्या मतपेढीचा प्रभाव नाही, तसा तो कॅनडातही शिखांच्या तुलनेत नाही’, असेच यावरून लक्षात येते. तेथील बहुतेक हिंदू हे बौद्धिकदृष्ट्या नोकरी आणि व्यवसाय यांत गुंतले आहेत. भारतविरोधी कॅनडाच्या भूमिकेविषयी त्यांनी आतातरी महत्त्वाची भूमिका बजावणे अपरिहार्य आहे. कॅनडातील भारतप्रेमी हिंदूंनीही आता त्यांच्याही मतपेढीचा इंगा कॅनडा सरकारला दाखवला पाहिजे. भारतप्रेमी हिंदू आणि शीख यांचेही वर्चस्व कॅनडा सरकाला लक्षात आले पाहिजे; कारण आतातर भारताने अधिकृतरित्या कॅनडाला फटकारून त्याच्यावर कारवाई केली आहे.

भारताने कॅनडाला जाब विचारावा !

कॅनडात १८ शीख खासदार आहेत, त्यांपैकी ८ जागा पूर्णपणे त्यांच्या आहेत. १५ जागांवर त्यांचा प्रभाव आहे, तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुद्वाराकडून तिथे निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात पैसाही पुरवला जातो. त्यामुळे कॅनडाच्या सरकारला शिखांना खुश ठेवायचे आहे. आतापर्यंत खलिस्तानवाद्यांनी भारताच्या विरोधात अनेक वेळा तिथे निदर्शने केली आहेत. कॅनडाने ती उघडपणे होऊ दिली आहेत. त्यामुळे आज भारताने उचललेले पाऊल खरेतर यापूर्वीच उचलले असते, तरी चालले असते, असे होते. कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांच्याविरुद्ध खटला चालवण्यापर्यंतची मागणी करण्यापर्यंत, तसेच भारत, भारताचा झेंडा आणि भारताचे पंतप्रधान यांचा अवमान करण्यापर्यंत खलिस्तान्यांची मजल गेली आहे अन् कॅनडा सरकारची त्याला उघड संमती आहे. भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या (कॅनडाने भारताकडे सुपुर्द करण्याच्या) गुन्हेगारांच्या सूचीत असलेल्या निज्जर याची हत्या झाली, तर त्या विरोधात कॅनडाने एवढी मोठी शोधमोहीम गांभीर्याने चालू ठेवणे, त्यासाठी भारतीय उच्चायुक्तांवर आरोप करणे आणि तेथील खलिस्तानवाद्यांनी त्यांना साथ देणे, हे खलिस्तानवादी अन् कॅनडा सरकार यांचे साटेलोटे आहेत. हे हिंदू आणि भारत यांच्या विरोधातील आहे अन् त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या ‘डाव्या’ विचारसरणीच्या लोकांची साथ आहे. अन्य देश कुठल्याही देशाला हवे असलेले गुन्हेगार करार करून त्या देशाला देतात, तर भारताचे शत्रूदेश त्याला हव्या असलेल्या भारतविरोधी गुन्हेगारांना पोसतात. मोदी शासनाला आणि देशाला धारेवर धरणार्‍या कृषी आंदोलनाला अर्थपुरवठा करणार्‍या, इतकेच नव्हे, तर भारताच्या पंतप्रधानांच्या जिवावर उठणार्‍या खलिस्तान्यांनाही कॅनडा पोसत आहे. आतंकवादाप्रमाणेच देश पोखरू पहाणार्‍या खलिस्तानी चळवळीचे मतांसाठी पालन-पोषण होऊ देणारा कॅनडा भारताचा छुपा नव्हे, तर उघड शत्रू आहे. ‘भारताने निज्जर याच्या हत्येच्या चौकशीत सहकार्य न केल्यामुळे आता परिस्थिती चिघळली आहे’, असे आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे; परंतु कॅनडाची आतापर्यंतची आगळीक ही भारत आणि हिंदू यांच्या विरोधीच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ट्रुडो यांच्या म्हणण्यानुसार ‘त्यांचे सरकार तेथील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देते आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांच्या विरोधात तेथील पोलिसांकडे असलेल्या पुराव्यांकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत.’ ‘एवढी वर्षे भारतविरोधी खलिस्तानला तुम्ही पोसत आहात, त्याचे पुरावे भारताकडे आहेत, त्याविषयी काय ?’, असे भारताने ट्रुडो यांना खडसावायला हवे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले रहाण्यासाठी कॅनडाने भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे, हे भारत किती दिवस सहन करणार ? आता ‘कॅनडातील ट्रुडो सरकारच्या भूमिकेमुळे भारतीय अधिकार्‍यांच्या सुरक्षेला धोका आहे’, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट करून त्यांना माघारी बोलावले, हे उत्तमच झाले. आता यापुढेही कॅनडाच्या विरोधात अशीच कणखर भूमिका घेतली पाहिजे. तेथील खलिस्तानवाद्यांपेक्षाही अधिक असलेले हिंदू आणि भारतप्रेमी शीख यांना एकत्र करण्याची चळवळ तिथे उभारली गेली पाहिजे. खलिस्तानवादी भूमिका ही आतंकवादाएवढीच भयानक असून ‘ही फुटीरतावादी भूमिका कुठल्याच देशाला लाभकारक नाही’, हेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने सांगितले पाहिजे. सतत भारतविरोधी खेळीला प्रोत्साहन देणार्‍या कॅनडावर तेथील मोठ्या प्रमाणात असलेल्या भारतप्रेमी नागरिकांच्या साहाय्याने मुत्सद्देगिरीने वचक बसवला पाहिजे आणि सतत खलिस्तान्यांना पाठिंबा देऊन भारताशी शत्रुत्व घेणार्‍या कॅनडाला आता नमते घेणे भाग पाडले पाहिजे !

कॅनडातील भारतप्रेमी हिंदूंनी आता त्यांच्या मतपेढीचा इंगा कॅनडा सरकारला दाखवला पाहिजे !