‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’त आणखी ११० तीर्थक्षेत्रांचा समावेश
मुंबई – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील ९५ आणि महाराष्ट्राच्या बाहेरील १५ अशा आणखी ११० तीर्थक्षेत्रांचा समावेश केला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील ६६ आणि महाराष्ट्राच्या बाहेरील ७३ तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश होता. या योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे.
सर्व धर्मीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबवली जात आहे. या योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्या ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे विनामूल्य दर्शन घडवण्यात येते. या योजनेत एका व्यक्तीला एकदाच लाभ घेता येतो. प्रतिव्यक्ती ३० सहस्र रुपयांपर्यंत या योजनेत व्यय निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ आणि राज्याभिषेक स्थळ यांचा समावेश !महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांमध्ये शिवनेरी (पुणे) गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ, तसेच रायगडावरील शिवराज्याभिषेक स्थळ यांचा समावेश करण्यात आला आहे. यासह श्री गोंदवलेकर महाराज यांचे गोंदवले हे स्थान (सातारा), महाड (रायगड) येथील चवदार तळे, रामटेक (नागपूर), भिडेवाडा (पुणे), पोहरादेवी (वाशीम), पाटणादेवी मंदिर (जळगाव), कुणकेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग) आदी स्थानांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील या तीर्थक्षेत्रांचा समावेश !आगरा किल्ला (उत्तरप्रदेश), मायाक्कादेवी मंदिर (कर्नाटक), गौतम बुद्धांची साधना भूमी (बिहार), संखेश्वर तीर्थ (गुजरात) |