रजोनिवृत्ती : सर्वसाधारण नियम
साधारण रजोनिवृत्ती वयाच्या आसपास अपान क्षेत्रातील त्रास वाढायला प्रारंभ होतो. साध्या भाषेत अपान वायू हा शरिरातील बेंबीखालील भागात काम करणारा वायू असून तो मुख्यतः मलपदार्थ बाहेर काढणारा आहे. रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव, म्हणजे स्तन दुखणे, पाय दुखणे; अंगावरून अधिक किंवा अल्प जायला लागणे, मूळव्याधीचा त्रास हे व्हायला प्रारंभ होतो. यासमवेतच मानसिक त्रास, स्वभाव पालटणे, निराश वाटणे या गोष्टीही होतात. अशा वेळी आयुर्वेद चिकित्सेचा अतिशय उत्तम उपयोग होतांना दिसतो. विशेषतः या कालावधीत अंगावर दुखणी काढू नयेत, अन्यथा त्याचा परिणाम पाळीच्या प्रकृतीवर दिसतो.
रजोनिवृत्तीचा त्रास अल्प जाणवण्यासाठी पाळावयाचे नियम
१. या वयात हे त्रास होऊ नये किंवा कमी व्हावेत; म्हणून आधीपासून बस्तीचा वार्षिक उपक्रम करून घ्यावा.
२. कंबरेचे व्यायाम, सेतुबंधासन, सूर्यनमस्कार अवश्य करावेत.
३. नुसते बसले असतांना तुमच्या शरिराच्या ठेवणीकडे अवश्य लक्ष द्या. कंबरेची किंवा पाठीची दुखणी या काळात पटकन बळावतात.
४. आधीपासून पित्ताचा त्रास असतांना अंगावरून अधिक जाऊ शकते. पित्ताचा त्रास हा औषध आणि पथ्य याने कायमचा आटोक्यात आणला जाऊ शकतो.
५. अधिक प्रमाणात पाणी पिणे, मध-लिंबू पाणी, गरम पाणी-मध असे सेवन करायला नको.
६. रात्री वेळेवर झोपणे अणि लवकर उठणे, हा शरिरातील वात नीट ठेवायला आवश्यक असा नियम आहे.
७. शिळे (शिळे म्हणजे आजचे उद्या) अन्न अजिबात ग्रहण करायला नको.
८. प्रतिदिन किमान हात, पाय आणि कंबर यांना तेल अवश्य लावावे.
९. मलावरोध आणि पोट डब्ब होत असल्यास आले-सैंधव पाचक दोन्ही जेवणाआधी खावे.
१०. नियमित जेवण वेळा पाळाव्यात. दुपारचे जेवण सकाळी ११ ते दुपारी १ यांच्यामध्ये आणि रात्रीचे ८ वाजण्याच्या आत करावे. नाश्त्याला भूक नसल्यास नाश्ता केला नाही, तरी चालेल.
११. मानसिक स्वास्थ्य, भावनांचा निचरा आणि आनंद या गोष्टी मिळवायला समुपदेशन, स्वसमुपदेशन, सिंहावलोकन अन् आवश्यकता भासल्यास औषधे घेऊन विशेष प्रयत्न करावा.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.