श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांची मर्दन (मालीश) सेवा करतांना श्री भवानीदेवीचे दर्शन होऊन साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘श्री भवानीदेवीचे सगुण रूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांना मर्दन करण्याची सेवा माझ्याकडे होती. एकदा मी ‘देवीच्या सेवेला जात आहे’, हा भाव मनात ठेवून ही सेवा करण्यासाठी गेले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई सुखासनावर (सोफ्यावर) बसून सेवा करत होत्या. मी आणि सहसाधिका त्यांच्या पायापाशी बसलो अन् त्यांचे चरण हातात घेऊन आम्ही मर्दन (मालीश) करायला आरंभ केला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्री भवानीदेवीच्या चरणांना मर्दन करत असल्याची अनुभूती येऊन देहभान हरपून जाणे 

१ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांना मर्दन करतांना साधिकेला ‘आपण तुळजापूरच्या भवानीदेवीच्या मंदिरात असून देवीच्या चरणांना मर्दन करत आहोत’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला आणि सहसाधिकेला म्हणाल्या, ‘‘केवळ १० – १५ मिनिटेच मर्दन (मालीश) करा.’’ आम्ही मर्दनसेवा चालू केली; परंतु काही मिनिटांनंतर माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले आणि मला पुढील अनुभूती आली, ‘मी जणू तुळजापूरच्या भवानीदेवीच्या मंदिराच्या गाभार्‍यात आहे आणि माझ्यासमोर भवानीदेवी हिरवी साडी आणि अलंकार परिधान करून स्मितहास्य करत आसनस्थ आहे. मी तिच्या चरणांशी बसले असून ‘तिचा एक चरण माझ्या मांडीवर आहे.’

ही सेवा चालू करण्यापूर्वी माझ्या मनात असा भाव किंवा विचार नव्हता. अकस्मात् असे दृश्य दिसायला लागल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले आणि ‘देवी खरेच माझ्यासमोर आहे’, असे मला वाटू लागले.

१ आ. मर्दनसेवा करतांना ‘देवीचा एक चरण सजीव आहे’, असे जाणवून साधिकेचे देहभान हरपून जाणे आणि मध्येच ‘तेथून निघून जावे’, असा विचार आल्यावर तिला देवीचे मारक रूप दिसणे : काही वेळाने पूर्ण मूर्तीरूपात असलेल्या देवीचा ‘माझ्या मांडीवर असलेला एक चरण सजीव आहे आणि ‘मी भगवंताचा सगुण स्पर्श अनुभवते आहे’, असे मला जाणवू लागले. नंतर ‘मी किती वेळ चरणांना मर्दन करत आहे’, याचे मला भानच राहिले नाही. मला माझे अस्तित्वही जाणवत नव्हते. मी ‘देवीचे चरण हातात धरून बसले असून तिची कृपा अन् सगुण स्पर्श अनुभवत आहे’, एवढेच मला कळत होते. हे सर्व चालू असतांना मध्येच एक क्षण मला सर्व असह्य होऊन ‘तेथून निघून जावे’, असे वाटले. त्या क्षणी देवीची स्मितहास्य करणारी मूर्ती अकस्मात् मारक रूपात दिसू लागली आणि माझ्या मनातील अस्वस्थता काही क्षणांत निघून गेली. नंतर देवी मला पुन्हा स्मितहास्य करतांना दिसू लागली. हे सर्व अनुभवत असतांना माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते.

खरेतर आम्हाला केवळ १० – १५ मिनिटेच मर्दन करायचे होते; पण आम्हाला वेळेचे भान राहिले नव्हते आणि ‘मी नुकतीच सेवा चालू केली आहे’, असे मला वाटत होते.

२. ‘अज्ञानामुळे देवाचे दर्शन अनुभवता येत नाही’, याची जाणीव होणे

सौ. अनन्या पाटील

माझी आई (पू. (सौ.) संगीता जाधव, सनातनच्या ७४ व्या समष्टी संत) अनेकदा तिच्या अनुभूती आम्हाला सांगायची. तेव्हा ती ‘मला देवाचे दर्शन झाले’, असे सांगायची. त्या वेळी मला वाटायचे, ‘आईचा भाव त्या टप्प्याचा असल्याने भावामुळे तिला तसे दिसत असेल !’ ही अनुभूती आल्यावर मात्र मला जाणीव झाली, ‘मी भाव ठेवला होता; म्हणून मला देवीचे दर्शन झाले’, असे नसून ‘भगवंत दर्शन देतो; पण अज्ञानामुळे ते अनुभवता येत नाही.’

३. अवर्णनीय आनंद अनुभवल्यावर कृतज्ञताभावात वाढ होणे

त्या स्थितीतील आनंद अवर्णनीय होता. माझे मन आणि बुद्धी यांमध्ये कोणतेच विचार किंवा जाणिवा नव्हत्या. माझे मन ‘साक्षात् देवीला पाहिले’, या कृतज्ञताभावात होते. गुरुमाऊली, मी काही क्षण ही स्थिती अनुभवली, तरी मला इतका आनंद मिळाला. संत अखंड याच आनंदात आणि भावावस्थेत असतात. त्यांच्या आनंदावस्थेची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही.

प्रार्थना

प.पू. गुरुमाऊली, आपल्या चरणी प्रार्थना आहे, ‘तुम्ही साधकांना तुमच्या कृपाछत्राखाली ठेवले आहे’, याविषयीची कृतज्ञता आमच्या मनात अखंड राहू दे. ‘अध्यात्माच्या अनंत ज्ञानाचे तुम्ही उधळलेले असंख्य ज्ञानमोती वेचावेत’, हीसुद्धा जाणीव आमच्या मनात नाही, तरी हे प्रभु, तुम्ही आमच्यावर ज्ञानमोत्यांची अखंड उधळण करत आहात. सर्व देवता आणि तीर्थे या सर्वांच्या दर्शनाचे पुण्य आपल्या चरणात सामावलेले आहे. त्या चरणी आम्हाला येता येऊ दे’, अशी प्रार्थना आहे !’

– सौ. अनन्या अक्षय पाटील (पूर्वाश्रमीची कु. वैष्णवी विष्णु जाधव), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक