‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्या हत्येचे जागतिक परिणाम !
हसन नसरूल्लाची हत्या ही पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताला संधी !
१. जागतिक शांततेसाठी खलनायक असलेल्या हसन नसरूल्लाचा अंत
‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्ला याची नुकतीच हत्या झाली. त्यामुळे इराणचा अप्रत्यक्षरित्या असलेला प्रभाव कमकुवत झाला आणि संपूर्ण मध्यपूर्वेला धक्का बसला. त्याच वेळी पाकिस्तान जागतिक स्तरावर अधिकाधिक एकाकी पडतांना दिसत आहे. पाकिस्तानचे धोरणात्मक लक्ष आणि प्रभाव न्यून होत आहे. त्यामुळे भारताला मुत्सद्दी आणि भूप्रदेश या दोन्ही बाजूंनी ठरावासाठी दबाव आणण्याची आवश्यकता भासू शकते. हसन नसरूल्लाची हत्या हा केवळ लेबनॉनसाठीच नव्हे, तर संपूर्ण मध्य-पूर्व आणि जग यांच्यासाठी एक निर्णायक क्षण आहे. नसरूल्ला हा ३ दशकांहून अधिक काळ संपूर्ण प्रदेशात हिंसा, आतंकवाद आणि अस्थिरता यांसाठी उत्तरदायी असलेल्या ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेचा चेहरा होता. इस्रायलवर आक्रमणे घडवून आणण्यापासून ते मध्यपूर्वेत इराणचा प्रभाव वाढवण्यापर्यंत ‘जागतिक शांततेचा खलनायक’ म्हणून नसरूल्लाची भूमिका निर्विवाद आहे. त्याच्या हत्येमुळे हिजबुल्ला, लेबनॉन आणि पश्चिम आशियातील व्यापक भूराजकीय परिस्थिती यांच्यासाठी एक नवीन अध्याय चालू होईल.
२. लेबनॉनबाहेर हिजबुल्लाच्या कारवाया
हिजबुल्लाचा सरचिटणीस म्हणून वर्ष १९९२ मध्ये हसन नसरूल्लाचा कार्यकाळ चालू झाला. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखालील गट जागतिक व्याप्ती असलेल्या निमलष्करी दलात रूपांतरित झाला. हिजबुल्लाच्या मोहिमा लेबनॉनच्या पलीकडेही पसरलेल्या आहेत. यात त्याच्या हिंसक मोहिमांना निधी पुरवणार्या गुप्त सैनिकी मोहिमा, आतंकवादी कारवाया आणि अमली पदार्थांची तस्करी यांचा समावेश आहे. सूत्रधार म्हणून नसरूल्ला याने इस्रायलविरुद्ध हिजबुल्लाच्या सैनिकी प्रयत्नांना मार्गदर्शन केले होते. इराणच्या पाश्चात्त्यविरोधी धोरणांशी त्याच्या गटाशी सांगड घातली होती.
३. नसरूल्लाच्या हत्येनंतर निर्माण झालेला संघर्ष आणि अस्थिरता
अ. नसरूल्लाच्या हत्येचे परिणाम केवळ हिजबुल्लापुरते मर्यादित रहाणार नाहीत. या घटनेमुळे आधीच राजकीय आणि आर्थिक संकटे यांचा सामना करत असलेल्या लेबनॉनमध्ये अस्थिरता वाढेल. लेबनॉनच्या राजकारणातील हिजबुल्लाचे वर्चस्व हा लेबनॉनची तटस्थता आणि शांतता राखण्याच्या संघर्षातील एक प्रमुख घटक आहे. या गटाने वारंवार देशाला इस्रायल आणि शेजारील देश यांच्या संघर्षात ओढले आहे.
आ. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिजबुल्लाच्या संदर्भात नेतृत्वाविषयीच्या संकटाचा इस्रायलच्या सुरक्षेला लाभ होईल. कमकुवत हिजबुल्लामुळे इस्रायलला अनेक दशकांपासून ग्रासलेल्या क्षेपणास्त्रांच्या आक्रमणांचा आणि सीमेपलीकडील घुसखोरीचा धोका न्यून होईल. हिजबुल्लामध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे इराणची आघाडी म्हणून काम करण्याची त्याची क्षमता अल्प होऊ शकते. त्यामुळे तेहरानचे लेबनॉनमधील पाय कमकुवत होऊ शकतात.
इ. हसन नसरूल्लाच्या हत्येमुळे इराणच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षांना मोठा धक्का बसला आहे. इराक, सिरिया आणि येमेन येथे विविध सैन्यदलांचा समावेश असलेल्या इराणच्या ‘रेझिस्टन्स एक्सिस’चा प्रमुख आधारस्तंभ म्हणून हिजबुल्ला गट काम करतो. हिजबुल्लाच्या माध्यमातून इराणने सत्तेचा अंदाज वर्तवला आहे आणि इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेपर्यंत त्याचा प्रभाव वाढवला आहे. त्यामुळे या प्रदेशातील स्थिरतेला सतत धोका निर्माण झाला आहे.
ई. इस्रायलला अप्रत्यक्ष युद्धात गुंतवण्यासाठी ‘प्रॉक्सी’ सैन्याचा वापर करण्याच्या इराणच्या धोरणात नसरूल्लाचे हिजबुल्लामधील नेतृत्व केंद्रस्थानी राहिले आहे. त्याच्या मृत्यूमुळे हिजबुल्लाच्या सैनिकी मोहिमांमध्ये समन्वय साधण्याची इराणची क्षमता कमकुवत होईल. परिणामी तेहरानला लेबनॉनमध्ये थेट कारवाई करण्यास भाग पाडले जाईल किंवा या प्रदेशातील प्रभाव गमावण्याची जोखीम असेल. याविषयी इराण थेट इस्रायलशी संवाद साधेल का ? हे केवळ वेळच सांगू शकेल.
उ. इराण नसरूल्लाच्या जागी आणखी एका निष्ठावंताला नेमण्याचा प्रयत्न करू शकतो; परंतु नसरूल्लाच्या हत्येमुळे हिजबुल्लामध्ये सत्तासंघर्षही होऊ शकतो. त्यामुळे या संघटनेची कार्य करण्याची क्षमता न्यून होऊ शकते. त्याचा थेट लाभ इस्रायल आणि अमेरिका यांना होईल. ही दोन्ही राष्ट्रे हिजबुल्लाला ‘महत्त्वाचा आतंकवादी धोका’ म्हणून पहातात. इस्रायलच्या दृष्टीने हिजबुल्ला असंघटित आहे, म्हणजे तात्काळ संघर्षाचा धोका न्यून आहे. त्यामुळे अधिक प्रादेशिक स्थैर्य शक्य आहे.
ऊ. नसरूल्लाच्या हत्येचे पडसाद लेबनॉनच्या पलीकडेही उमटले. हिजबुल्लाच्या सैनिकी मोहिमा बर्याच काळापासून सिरिया आणि इराक यांच्यापर्यंत पसरल्या आहेत. या गटाने तेथे असद राजवटीचे रक्षण करण्यासाठी आणि इराणला त्याचा प्रभाव पसरवण्यास साहाय्य करण्यासाठी लढा दिला आहे. नसरूल्लाच्या अनुपस्थितीमुळे या संघर्षक्षेत्रांमध्ये प्रभावीपणे काम करण्याची हिजबुल्लाची क्षमता कमकुवत होऊ शकते.
ए. सिरियामध्ये ‘बशर अल्-असद’च्या शासनाला चालना देण्यासाठी आणि सामरिक क्षेत्रांवर इराणी नियंत्रण राखण्यासाठी हिजबुल्लाचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे. हिजबुल्लामध्ये नेतृत्वाचे संकट आल्याने ही मोहीम चालू ठेवण्याची त्याची क्षमता मर्यादित होऊ शकते. यामुळे सिरियातील इराणचा प्रभाव कमकुवत होऊ शकतो.
४. अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र यांच्यासाठी आतंकवादविरोधी लढाईतील महत्त्वपूर्ण विजय !
हिजबुल्लाला आणखी वेगळे पाडण्यासाठी आणि इराणी प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी इस्रायल नसरूल्ला याच्या मृत्यूचा लाभ उठवू शकतो. परिणामी सत्तेची ही पोकळी अरब राज्ये आणि प्रादेशिक बंडखोर या इराणच्या विरोधी शक्तींना त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यास प्रोत्साहित करू शकते. त्यामुळे अमेरिकेशी जोडलेल्या सैन्याच्या बाजूने सत्तेचे संतुलन पालटू शकते. अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र यांच्यासाठी नसरूल्लाच्या हत्येकडे ‘आतंकवाद विरोधातील लढाईतील महत्त्वपूर्ण विजय’, म्हणून पाहिले जाईल. हिजबुल्लाला बर्याच काळापासून अमेरिका सरकारने ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. अमेरिकी आणि इस्रायली लक्ष्यांवर आक्रमणे घडवून आणण्यात ही संघटना आतंकवादाच्या जागतिक युद्धात एक प्रमुख शत्रू बनली होती.
५. हिजबुल्लाचा प्रभाव न्यून करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न
अमेरिकेने हिजबुल्लाचे आर्थिक आणि कारवायांचे जाळे कमकुवत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नसरूल्लाला हटवणे, हा या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे अमेरिकेला हिजबुल्लाला आणखी वेगळे करण्याची, त्याच्या सदस्यांवर अतिरिक्त निर्बंध लादण्याची, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध आर्थिक व्यवहार यांसारख्या अवैध व्यवहारांच्या माध्यमातून निधी उभारण्याची क्षमता न्यून करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
(क्रमश:)
– श्री. सिद्धार्थ दवे, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांतील तज्ञ, देहली.
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/845216.html
संपादकीय भूमिकानसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे ! |