Pannun Threatens Canadian MP : खलिस्‍तानी आतंकवादी पन्‍नू याची कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांना ठार मारण्‍याची धमकी

डावीकडून खासदार चंद्रा आर्य आणि खलिस्‍तानी आतंकवादी पन्‍नू

ओटावा (कॅनडा) – ‘सिख फॉर जस्‍टिस’ या बंदी घातलेल्‍या खलिस्‍तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्‍नू याने कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे. चंद्रा आर्य कॅनडातील वाढत्‍या खलिस्‍तानी आतंकवादावर सातत्‍याने टीका करत आहेत. नुकतेच चंद्रा आर्य यांनी कॅनडाच्‍या संसदेत कॅनडातील हिंदूंना लक्ष्य करणार्‍या हिंसाचाराबद्दल चिंता व्‍यक्‍त केली होती आणि त्‍याचा थेट संबंध खलिस्‍तानी आतंकवादाशी असल्‍याचे म्‍हटले होते.

पन्‍नू याने खासदार चंद्रा आर्य यांना धमकी देणारा ऑडिओ संदेश प्रसारित केला आहे. २ मिनिटांच्‍या या संदेशात पन्‍नू याने चंद्रा आर्य यांच्‍यावर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंदवण्‍याची मागणी केली. पन्‍नू यांनी ‘चंद्रा आर्य हे भारत सरकारचे मुखपत्र असल्‍याप्रमाणे वागतात आणि खलिस्‍तान समर्थकांबद्दल चुकीची माहिती पसरवतात’, असा फुकाचा आरोप केला. ‘चंद्रा आर्य यांना त्‍याचे परिणाम भोगावे लागतील. चंद्रा आर्य, तुम्‍ही संपण्‍याची वाट पहा’, अशी धमकी दिली आहे.

संपादकीय भूमिका

कॅनडाचा एक नागरिक पन्‍नू याच देशातील खासदाराला ठार मारण्‍याची धमकी देतो आणि त्‍याच्‍यावर ट्रुडो सरकार काहीच कारवाई करत नाही, यातून ट्रुडो सरकारचा दुटप्‍पीपणा उघड होतो ! अशा सरकारला भारतावर आरोप करण्‍याचा कोणताही अधिकार नाही, हे भारताने जागतिक व्‍यासपिठावरून सांगितले पाहिजे !