थोडक्यात महत्त्वाचे : रेल्वेत टायमर बाँब ठेवल्याची धमकी !… ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू…

रेल्वेत टायमर बाँब ठेवल्याची धमकी !

जळगाव – ‘मुंबई-हावडा मेल’ या रेल्वेमध्ये टायमर बाँब ठेवला असून नाशिक रेल्वेस्थानक येण्यापूर्वी त्याचा स्फोट होणार आहे, अशी धमकी ‘एक्स’वरून रेल्वे पोलिसांना मिळली. जळगाव रेल्वे स्थानकावर १४ ऑक्टोबरच्या पहाटे गाडी येताच रेल्वे पोलीस, जळगाव पोलीस दल आणि बाँबशोधक पथक यांनी गाडीची पडताळणी केली. कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू न आढळल्याने गाडी पुढे रवाना करण्यात आली.

संपादकीय भूमिका : अशी धमकी देणार्‍यांना शोधून पोलिसांनी त्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !


ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

वसई – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुप्रीम हॉटेलच्या समोर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात राजेश यादव (वय ४२ वर्षे) ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.


परतीच्या पावसाने नद्यांना पूर !

जळगाव – १३ ऑक्टोबरला रात्रभर झालेल्या पावसाने नगरदेवळा (तालुका पाचोरा) परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर आला. अग्नावती नदीच्या पुराचे पाणी नगरदेवळा येथील बाजारपेठेत शिरून व्यावसायिकांची प्रचंड हानी झाली. शेतशिवारातील कपाशी, केळी, मका, ज्वारी, बाजरी, मूग आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांवर संकट ओढावले.


दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रहित !

एस्.टी. महामंडळाचा निर्णय

मुंबई – दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस्.टी. महामंडळाकडून करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रहित करण्यात आली आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती; मात्र प्रवाशांना दिलासा देत महामंडळाने भाडेवाढ रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रकृती बिघडल्याने उद्धव ठाकरे रुग्णालयात भरती !

मुंबई – शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता त्यांच्या चाचण्या केल्या. आताही त्यांची अँजिओप्लास्टी केल्याचे समजते.