मंदिर जतन-संवर्धनाची कामे पुरातत्व विभाग, संबधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

४ ते २० नोव्हेंबर कालावधीत २४ घंटे दर्शन !

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता, तसेच मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून चालू आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित कंत्राटदारांनी या कामास गती देऊन वेळेत अन् गुणवत्तापूर्ण काम करावीत. (असे का सांगावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) आराखड्यातील काम अत्यंत संथगतीने चालू असल्याने संबंधित कामाविषयी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेच्या कालावधीत ४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती  पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची मासिक सभा १३ ऑक्टोबरला पार पडली. या वेळी मंदिर समितीचे विविध सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, पुरातत्व विभागचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, वास्तूविशारद, ठेकेदार, तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कम्युनिटी रेडिओ प्रवर्तित करण्याचा मंदिर समितीचा मानस !

महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय आणि महान संत परंपरा आहे. या परंपरेतील साहित्य, संस्कृती, परंपरा, कला इत्यादींना एकत्र आणून एक हक्काचे व्यासपीठ देणारा प्रकल्प जो शासन आणि जनमानसालासुद्धा उपयुक्त ठरेल. या दृष्टीने संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच पंढरपूर (श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर), आळंदी (श्री संत ज्ञानदेव), त्र्यंबकेश्वर (श्री संत निवृत्तीनाथ), सासवड (श्री संत सोपानदेव), मुक्ताईनगर (श्री संत मुक्ताबाई), पैठण (श्री संत एकनाथ) आणि देहू (श्री संत तुकाराम) येथे ‘कम्युनिटी रेडिओ’ प्रवर्तित करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. या सर्वांचे पालकत्व आणि नेतृत्व करण्यास श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती सिद्ध आहे.

संतवाणी रेडिओ आणि ॲपद्वारे जगभरात आपणास महाराष्ट्रातील संतवाङ्मय पोचवता येईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी संबंधित विषय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करण्याच्या कामी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना प्रस्ताव सादर येणार असल्याची माहिती या वेळी औसेकर महाराज यांनी दिली.