वेळागर (शिरोडा, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे ३० वर्षांनी ‘ताज हॉटेल’चे भूमीपूजन
|
वेंगुर्ला – तालुक्यातील वेळागर, शिरोडा येथे १३ ऑक्टोबर या दिवशी पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे पर्यटनमंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या गाड्या काही शेतकर्यांनी रोखल्या. संतप्त शेतकर्यांनी घोषणाबाजी करत भूमीपूजनाला विरोध चालू ठेवल्याने अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या लाठीमारात काही जण घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.
वेळागर येथे ‘ताज हॉटेल’ उभारण्यावरून गेली २० वर्षे वाद चालू आहे. ‘ताज हॉटेल करण्यास आमचा विरोध नाही; मात्र स्थानिक शेतकरी आणि बागायदार यांची येथील ९ हेक्टर भूमी वगळून हा प्रकल्प करावा’, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली, तसेच शासनदरबारी निवेदनेही देण्यात आली. येथे ताज हॉटेलचे भूमीपूजन केले जाणार आहे, हे समजल्यानंतर स्थानिक शेतकरी आणि बागायतदार यांनी ‘आमची ९ हेक्टर भूमी वगळण्याची मागणी मान्य केली जात नाही, तोपर्यंत भूमीपूजन होऊ देणार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार १३ ऑक्टोबरला मंत्री महाजन आणि केसरकर येथे आले असता स्थानिकांनी घोषणा देत आंदोलन केले अन् या मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. यामुळे येथील वातावरण तंग बनले होते. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात भूमीपूजन करण्यात आले. संतप्त शेतकर्यांची पर्यटनमंत्री महाजन यांनी भेट घेऊन चर्चा केली आणि ‘स्थानिकांना विश्वासात घेतल्याखेरीज एक इंचही भूमी शासन घेणार नाही’, असा शब्द दिला. त्यानंतर शेतकरी शांत झाले.
स्थानिकांना भडकावल्याने हा प्रकार घडला ! – मंत्री दीपक केसरकर
याविषयी मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘येथील शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे लेखी पत्र यापूर्वीच दिले आहे. असे असतांना कुणीतरी स्थानिकांना भडकावल्याने हा प्रसंग घडला, तसेच एकदा लेखी पत्र दिलेले असतांना पुन्हा तशी मागणी करणे चुकीचे आहे. विधानसभेची आचारसंहिता लवकरच घोषित होणार आहे. त्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांना देय रक्कम देता यावी आणि प्रकल्पाचे काम चालू व्हावे, यासाठी भूमीपूजन करण्यात आले. आता लवकरच प्रकल्पग्रस्तांना देय रकमेचे वाटप केले जाईल.’’
संबंधित पोलीस अधिकार्यांची चौकशी होणार !
वेळागर येथे मंत्री येणार आहेत, हे माहीत असतांना स्थानिकांच्या व्यतिरिक्त अन्य पक्षांचे लोक येथे कसे आले ? आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आणि आमची भेट घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे होता; पण तसे झाले नाही. त्यामुळे पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकार्यांची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी या वेळी सांगितले.
… तर विरोध झाला नसता ! – शेतकरी संघर्ष समिती
भूमीपूजनासाठी मंत्री येणार आहेत, हे समजल्यावर येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दुपारपासून शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी एकत्र येऊन घोषणाबाजी करत होते. या वेळी संघटनेचे मार्गदर्शक जयप्रकाश चमणकर, संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, आजू आमरे यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. मंत्री केसरकर यांनी स्थानिकांचा विरोध असतांना आणि त्यांना विश्वासात न घेता भूमीपूजन केले. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही विरोध केला. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या, तर कोणताही विरोध झाला नसता, असे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर यांनी सांगितले. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.