‘सनबर्न’ला उत्तर गोव्यातही वाढता विरोध
पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’ला (ई.डी.एम्.ला) उत्तर गोव्यातूनही विरोध होऊ लागला आहे. यापूर्वी उत्तर गोव्यातील कामुर्ली गावाने गावात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. यानंतर आता हणजूण येथे ‘सनबर्न’चे आयोजन करण्याच्या हालचालींना प्रारंभ झालेला आहे. स्थानिक कार्यकर्ते डेस्मंड आल्वारीस, डॉ. इनासियो फर्नांडिस आणि समुद्रकिनारपट्टीतील अनेक रहिवासी यांनी ‘ई.डी.एम्.’च्या विरोधात स्वाक्षरी मोहीम आरंभली आहे. विरोध करणार्यांच्या मते असे महोत्सव गोव्याचे पर्यावरण आणि संस्कृती यांना हानीकारक आहेत.
‘सनबर्न’सारख्या ‘ई.डी.एम्.’ महोत्सवाला विरोध करणार्यांनी यासंबंधी एक निवेदन स्थानिक प्रशासनाला दिले आहे. यामध्ये स्थानिक म्हणतात, ‘‘अमली पदार्थांचे सेवन केले जाणे, पर्यावरणाची हानी होणे आणि स्थानिक परंपरेला छेद देणारे ‘ई.डी.एम्.’ महोत्सव बंद करावे. गोव्याची लोकसंख्या अल्प आहे आणि ‘ई.डी.एम्.’ महोत्सवामुळे येणार्या पर्यटकांमुळे गोव्यातील सांस्कृतिक वारशाला हानी पोचते. यामुळे सरकारने ‘सनबर्न’,‘टी.व्ही.एस्. मोटोसोल, बॉलीवूडचे कार्यक्रम आदी मोठ्या स्वरूपातील कार्यक्रमांना अनुमती देऊ नये.’’ याविषयी अधिक माहिती देतांना डेस्मंड आल्वारीस म्हणाले, ‘‘गोव्याची संस्कृती निराळी आणि संवेदनशील आहे. ‘ई.डी.एम्.’ महोत्सव आमच्या संस्कृतीला बाधक आहेत.’’ नागरिकांच्या मते ‘ई.डी.एम्.’सारख्या महोत्सवामुळे अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. या महोत्सवामुळे समाजात नकारात्मकता पसरते. सरकारने गोव्याची संस्कृती टिकवणार्या कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावे.
संपादकीय भूमिकागोमंतकीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलसारख्या प्रदूषणकारी महोत्सवांना शासनाने अनुमती देऊ नये ! |