शासकीय कारभाराचे ‘मराठी’करण करण्यासाठी झटणारे आणि  तिला ज्ञानभाषा करण्यात योगदान देणारे मराठी भाषा संचालनालय !

आज वाचन प्रेरणा दिन आहे. त्या निमित्ताने…

‘माझिया मराठीचे नगरी…’

घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याचे केंद्रशासनाने घोषित केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर मराठी भाषा वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवण्यासाठी निधी आणि चालना मिळू शकते; पर्यायाने मराठीचे संवर्धन अधिक गतीने होऊन मराठीची दुःस्थिती पालटण्यास साहाय्य होऊ शकते, अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.

 

१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनाने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित केला आहे. हा मराठी भाषेचा वापर वृद्धींगत होण्याच्या दृष्टीनेच केलेला उपक्रम आहे.

वरील दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने सध्या राज्यात मराठी भाषेची समृद्धी, चालना, विकास, वापर आदींच्या दृष्टीने काय काम केले जाते ? किंवा काय उपक्रम राबवले जात आहेत ? यांविषयीचा थोडक्यात गोषवारा या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे.

मुळातच अभिजात असलेल्या मराठीवर आलेले परकीय भाषांचे मळभ दूर करून, तिला अधिकाधिक शुद्ध, म्हणजे सात्त्विक करून, तिच्या निर्मळ स्वस्वरूपाचे चैतन्य मराठीजनांना अनुभवास येण्यासाठी शासनस्तरावरून सामान्य मराठीजनांपर्यंत काय काय प्रयत्न चालू आहेत ? आणि अजून मोठा पल्ला गाठण्यासाठी काय काय करू शकतो ?, यांचे थोडक्यात आकलन या लेखमालिकेतून करून घेण्याचा प्रयत्न करू !

भाग १.

१. मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणार्‍या संस्था

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनेक विभागांप्रमाणेच ‘मराठी भाषा विभाग’ हा एक विभाग आहे. त्याअंतर्गत पुढील संस्था येतात.

अ. मराठी भाषा संचालनालय

आ. मराठी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

इ. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

ई. राज्य मराठी विकास मंडळ

सौ. रूपाली वर्तक

२. भाषा संचालनालयाची ओळख

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० या दिवशी झाली. लगेचच पुढील मासात, म्हणजे जुलै १९६० मध्ये ‘मराठी भाषा संचालनालया’ची स्थापना करण्यात आली. मराठी भाषेचे शासनाच्या व्यवहारामध्ये वापराचे धोरण निर्माण करणे आणि राबवणे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर आजपर्यंत तिची व्याप्ती पुष्कळ वाढत गेली. सध्या सौ. विजया डोनीकर या भाषा संचालनालयाच्या मुख्य संचालिका म्हणून काम पहातात. या विभागाची ४ उपकार्यालये नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कामकाजाशी संबंधित मराठी भाषेचे काम या कार्यालयांतून चालते. भाषा संचालनालयातील सर्व अधिकारी आणि काही कर्मचारी हे मराठी विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत.

३. मराठी भाषा संचालनालयाची विविध कार्ये

अ. परिभाषा कोशांची निर्मिती करणे आणि त्यांचे पुनर्निर्माण करणे

आ. राज्य शासनाच्या स्तरावरील अनेकविध प्रकारचे शासकीय साहित्य (उदा. परिपत्रके, सूचना, अहवाल, नियम, आदेश, कायदे, अर्थसंकल्प, निवडणुकांविषयीचे नियम, राज्यपालांचे अभिभाषण आदी) यांचा मराठीत अनुवाद करणे

इ. केंद्रीय स्तरावर पारीत झालेल्या राज्याशी निगडित कायद्यांचा मराठीत अनुवाद करणे

ई. प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सर्व स्तरांवर मराठीत कामकाज होत आहे ना ? हे वारंवार पडताळणे, त्यासाठी पहाणी दौरे करणे

उ. ज्या प्रशासकीय अधिकार्‍यांना शालेय शिक्षणात पहिली भाषा मराठी नव्हती, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्यशासनाने पदोन्नती अन् निवृत्तीवेतन यांसाठी बंधनकारक केलेल्या ‘मराठी भाषा’ विषयाच्या परीक्षा घेणे आणि त्यासाठी संबंधितांना साहाय्य करणे

भाषा संचालनालयाच्या कार्यालयाचे वैशिष्ट्य !

मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत ५ व्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे अत्यंत झोकून देऊन काम करणारे आणि कर्तव्यदक्ष आहेत. शासकीय कार्यालये म्हटली की, तिथे जाणवणारा कामचुकारपणा आिण टंगळमंगळ यांना इथे स्थान नाही. या कार्यालयाच्या सेवांची व्याप्ती, समयमर्यादा आणि काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या पहाता ते करत असलेले काम हे उल्लेखनीय आणि विशेष नोंद घेण्याजोगे आहे. केवळ सर्व शासकीय कामकाज, सूचना या जनतेपर्यंत मराठीत पोचण्यासाठी या कार्यालयातील कर्मचारी काही वेळा अक्षरशः दिवसरात्र काम करत असतात. प्रसंगी रात्री उशिरापर्यंत थांबूनही हे काम चालते. अल्प समयमर्यादेत सहस्रो पाने असलेली बाडे (गठ्ठे) येथे अनुवादित केली जातात.

– सौ. रूपाली अभय वर्तक

 ४. मराठी भाषा संचालनालयनिर्मित परिभाषा कोश निर्मितीचे महत्त्व

आतापर्यंत विविध विषयांवरील ३० मराठी परिभाषा कोश आणि शासकीय व्यवहारासाठी काही पुस्तिका मराठी भाषा विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. कृषी, आरोग्य, अभियांत्रिकी अशा विविध विषयांच्या कोशांत त्या विषयांतील ‘संज्ञा’ आणि शब्द यांचा समावेश असतो. आतापर्यंत ३ लाख संज्ञा किंवा शब्द या कोशांत आले आहेत.

४ अ. विविध विषयांतील (अन्य भाषांतील) संज्ञा, संकल्पना, शब्द यांचे मराठी ‘शब्द’ उपलब्ध झाल्याने मराठी ‘ज्ञानभाषा’ होण्यास साहाय्य होणे : (संज्ञा म्हणजे व्यक्ती, वस्तू, स्थान, प्राणी, भाव, विषय, संकल्पना यांचे प्रतिनिधित्व करणारा शब्द.)

‘उच्च शिक्षणासाठी इंग्रजी भाषेविना पर्याय नाही’ अशी काहीशी स्थिती आणि वातावरण पूर्वीपासून आहे; त्यामुळे काही विद्यार्थी सक्षम असूनही भाषेच्या अडचणीमुळे पुढे जाऊ शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते. आता केंद्र शासनानेही राज्य भाषांमध्ये उच्चशिक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. विविध विषयांतील संज्ञा, शब्द यांचे मराठी अर्थ या परिभाषा कोशांत असल्याने उच्च शिक्षणातील त्या विषयाचा पाठ्यक्रम किंवा पुस्तके मराठीतही उपलब्ध करता येऊन शकतात. अशा प्रकारे मराठी ही इंग्रजीप्रमाणेच विविध विषयांची ‘ज्ञानभाषा’ होऊ शकतो. परिभाषा कोशांच्या निर्मितीमुळे (मूळ इंग्रजीमध्ये असलेल्या) विविध विषयांतील संज्ञा, संकल्पना, शब्द यांना मराठी शब्द उपलब्ध झाले आहेत. या विषयांची पुस्तकनिर्मिती, तसेच अध्यापन किंवा अध्ययन यांना मोठे साहाय्य होणार आहे. पर्यायाने मराठी ‘ज्ञानभाषा’ होण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे या कोशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाषेची शब्दसंपदाही त्यामुळे वाढते.

विविध विषयांतील मराठी भाषेतील संज्ञांचेही अर्थही यात दिलेले असतात.

४ आ. विविध विषयांच्या अभ्यासकांना, प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, तसेच सर्वच क्षेत्रांतील लोकांना संदर्भासाठी हे कोश विशेष उपयुक्त ठरतात.

४ इ. शासनाच्या विविध विषयांशी संबंधित (उदा. कृषी, शिक्षण, अभियांत्रिकी, वाहतूक, वैद्यकीय आदी) खात्यांची विविध परिपत्रके, आदेश, सूचना, नियम, पाट्या सिद्ध करणे, त्यांचे लिखाण, सर्व व्यवहार हे मराठी भाषेतून करणे शक्य होण्यासाठी हे कोश अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. यामुळे शासनाच्या सर्व विभागांमधील शासकीय कामकाजात मराठी शब्दांचा वापर करणे शक्य झाले आहे आणि होत आहे. आज या कोशांमुळे इंग्रजी संज्ञाना मराठी प्रतिशब्द सहज उपलब्ध झाले आहेत; अन्यथा इंग्रजी शब्दांचा वापर वाढला असता.

(क्रमश:)

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संपादकीय भूमिका

मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांनी मराठीचा वापर करणे आणि सरकारने त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक !