सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर गुरुरूपात लाभल्याने जीवनात आमूलाग्र पालट अनुभवणार्या मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सौ. शीलादेवी गावडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८५ वर्षे) !
१. ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात येण्यापूर्वी
१ अ. साधना : ‘मी साधनेत येण्यापूर्वी पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये, उपवास आदी करत होते; मात्र ते पूर्ण श्रद्धेने होत नव्हते. ते करतांना माझ्या मनात मायेची ओढ अधिक असायची.
१ आ. अहंभावामुळे घरचे वातावरण सतत बिघडणे : आमच्या कौटुंबिक जीवनात आम्हा उभयतांमध्ये वादविवाद व्हायचे. मला मुलांच्या भविष्याची पुष्कळ काळजी असायची. माझ्या मनात कुटुंबाप्रती अपेक्षा असायच्या. माझ्यात पुष्कळ अहंभाव होता आणि तो जपण्याचा प्रयत्न अन् अट्टहासही असायचा. त्यामुळे घरचे वातावरण सतत बिघडायचे.
२. ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात आल्यानंतर झालेले लाभ
माझ्या अनेक जन्मांच्या भाग्यामुळे कि काय, वर्ष १९९८ मध्ये मला ‘सनातन संस्थे’च्या सत्संगाचा लाभ झाला. त्यानंतर माझ्या जीवनात आमूलाग्र पालट होऊ लागले.
अ. उपवास, व्रत-वैकल्ये आदी कर्मकांडे माझ्याकडून श्रद्धेने आणि भावपूर्ण रीतीने होऊ लागली.
आ. मी आमची कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, यांचा नामजप करायला लागले. त्यामुळे माझ्या मनाला शांती मिळू लागली.
इ. पुढे मी सत्संगाला जाऊ लागले आणि नंतर माझ्या मनात सत्सेवेला जाण्याची ओढही निर्माण झाली.
ई. त्यानंतर मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात येऊ लागले. ‘परात्पर गुरुदेवांनी अष्टांग साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘स्वभावदोष आणि अहं कसे घालवायचे ?’, हेही शिकता आले आणि माझ्याकडून तसे प्रयत्न होऊ लागले.
३. श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !
माझ्या अनेक जन्मांचे भाग्य म्हणून आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरुरूपात लाभले. त्यांनी साधकांना शिकवले की, ‘साधकांनी संसाराचा नव्हे, तर संसारातील आसक्तीचा त्याग करायचा आहे.’ त्यानंतर ‘आई-वडील आपल्याला जन्म देतात आणि आपला सांभाळ करतात; पण ते मुक्ती देऊ शकत नाहीत. केवळ आपले गुरुच आपल्याला मुक्ती देऊ शकतात’, याची मला जाणीव झाली.
‘परात्पर गुरुदेवांनी स्वतःचे संपूर्ण जीवन साधकांसाठी समर्पित केले आहे. अशा गुरूंचे ॠण मी कधीच फेडू शकत नाही. त्यांच्या चरणी मी अनन्यभावाने आणि शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते !’
– सौ. शीलादेवी द्वारकानाथ गावडे (वय ८५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), चौके, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (२५.७.२०२४)