मुंबईतील ५ टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना ‘टोलमाफी’ !
मुंबई – आनंदनगर, दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली या मुंबईत प्रवेश करतांना लागणार्या पाचही टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना टोल न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ‘टोलमाफी’ लागू होणार आहे.
वरील पाच टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना ४५ रुपये इतका टोल द्यावा लागत होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मात्र सरकारने विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन ‘टोलमाफी’चा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत केले आहे.
लाखो लोकांना टोलमाफीचा लाभ होईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
गर्दी आणि वाहतूककोंडी यांपासून सुटका व्हावी, यासाठी यापूर्वी अनेकांनी ‘टोलमाफी’ची मागणी केली होती. मी आमदार असतांना ‘टोलमाफी’साठी आंदोलन केले होते आणि यासाठी न्यायालयातही गेलो होतो. खासगी चारचाकी वाहनाने प्रवास करणार्या लाखो लोकांना याचा लाभ होणार आहे. यामुळे वेळ, तसेच इंधन वाचेल आणि प्रदूषणही न्यून होण्यास साहाय्य होईल. निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून नव्हे, तर सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोलमधून संपत्ती गोळा करणार्यांची चौकशी व्हायला हवी ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
‘टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी. जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झाले आहेत, तेथील रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत’, या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली. सरकार कुणाचेही असो, त्यांना टोकाचे पाऊल उचलल्याविना गांभीर्य कळत नाही. हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. मुंबई टोलमुक्त झाली; पण यापूर्वी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या. खरेतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. तशी ती होईल याची निश्चिती नाही; कारण कुणी कुणाला पकडायचे ? हा प्रश्न आहे.