श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा होत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस असतो. २५.९.२०२२ या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा होतांना मी अनुभवलेल्या भावस्थितीबद्दलची माहिती येथे दिली आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून आनंद वाटणे

सर्वपित्री अमावास्या असूनही मला वातावरणात दाब जाणवत नव्हता. मला सकाळपासूनच आनंद होत होता. मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन होण्याची आणि त्यांच्या सत्संगाची आतुरतेने वाट पहात होते. मला ‘देवीचा उत्सव साजरा होणार आहे’, असे आतून वाटले आणि मी त्यासाठी सिद्ध होऊन आश्रमात आले. आम्ही ध्वनीचित्रीकरण कक्षात प्रवेश केल्यावर मला शांत वाटले आणि माझ्या मनाला स्थिरता जाणवत होती.

२. व्यासपिठावरून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होत असणे आणि श्री. विनायक शानभाग यांनी सूत्रसंचालन करणे चालू केल्यावर आनंदाचे प्रमाण वाढणे

व्यासपिठावर ३ आसंद्या ठेवल्या होत्या. त्या आसंद्यांवर कुणीही बसले नव्हते, तरीही त्यातून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होत होती. मला ‘त्या आसंद्यांकडे पहातच रहावे’, असे वाटले. ‘श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) सूत्रसंचालन करू लागल्यावर वातावरणात आनंदाचे प्रमाण वाढत आहे’, असे मला जाणवत होते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ देवीच्या मूर्तीप्रमाणे तेजस्वी दिसणे आणि ‘सोहळा वेगळ्याच लोकात होत आहे’, असे जाणवणे

काही वेळाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ध्वनीचित्रीकरण कक्षात आल्या. ‘त्यांचे रूप आणि सौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवावे’, असे मला वाटले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुलाबी साडी नेसल्या होत्या. त्या पुष्कळ तेजस्वी दिसत होत्या आणि त्यांचा चेहरा गुलाबी दिसत होता. त्यांच्याकडे पाहून ‘एखाद्या मंदिराच्या गाभार्‍यातील देवीची मूर्ती सजीव झाली आहे’, असे मला वाटत होते. त्यांना पाहून माझी भावजागृती होत होती. ‘हा सोहळा वेगळ्याच लोकात होत आहे’, असे मला जाणवत होते.

४. डोळे बंद केल्यावर तेजस्वी प्रकाश आणि अष्टभुजा देवी दिसणे अन् भावजागृती होणे

सौ. तन्वी सरमळकर

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्हाला डोळे बंद करायला सांगून तिथे निर्माण झालेले भावविश्व अनुभवायला सांगितले. तेव्हा मला समोर अतिशय तेजस्वी असा प्रकाश दिसत होता. मला तेथे साक्षात् अष्टभुजा देवी दिसत होती. ती सगळ्यांना आशीर्वाद देत होती. त्या तेजस्वी दिव्य प्रकाशात आम्ही सगळे जण न्हाऊन गेलो होतो. माझी अखंड भावजागृती होत होती.

५. डोळे उघडल्यावर तिन्ही गुरूंचे एकत्रित दर्शन झाल्याने निःशब्द होणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्हाला डोळे उघडायला सांगितल्यावर समोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन झाले. आम्ही तिन्ही गुरूंना पाहून निःशब्द झालो. ते सुंदर दृश्य पाहून माझे मन भरून आले आणि मला पुष्कळ आनंद झाला.

६. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या साधनेच्या प्रवासाविषयी जाणून घेत होत्या. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या बोलण्यातून त्यांच्यामधील गुरुदेवांप्रतीचा अपार भाव आणि अढळ श्रद्धा या गुणांचे मला दर्शन झाले.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके ठेवल्यावर ‘गुरुमाऊलींकडून त्यांच्याकडे शक्ती आणि प्रीती यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत अन् सोहळा पहाण्यासाठी अनेक देवता आणि ऋषी सूक्ष्मातून आले आहेत’, असे जाणवणे

त्या वेळी मी सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके टेकवले होते. तेव्हा ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे जाणवत होते. मी गुरुमाऊलींचे अतिशय सुंदर रूप न्याहाळत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके ठेवल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचा भाव जागृत झाला. ‘गुरुमाऊलींकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडे शक्ती आणि प्रीती यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवत होते. मला बाह्य जगाचा विसर पडला होता. हा सोहळा पहाण्यासाठी अनेक देवता आणि ऋषी सूक्ष्मातून आले होते. ‘हा क्षण संपूच नये’, असे मला वाटत होते.

‘हे गुरुमाऊली, आम्हाला हे क्षण अनुभवायला दिल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे ! ‘आपणच आम्हाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून अखंड शिकण्याच्या स्थितीत ठेवा. आम्हा सर्वांना आपल्याला अपेक्षित असे लवकरात लवकर घडता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. तन्वी सिमीत सरमळकर, फोंडा, गोवा. (३१.१०.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
    म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक