‘नो बिंदी, नो बिझनेस’ चळवळीचा सकारात्मक प्रभाव !
(टीप : ‘नो बिंदी, नो बिझनेस’ चळवळ : विज्ञापन करणार्या महिलेच्या कपाळावर कुंकू अथवा टिकली लावलेली नसेल, तर त्या उत्पादकाच्या मालावर बहिष्कार घालण्याविषयीची चळवळ)
भारतात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात विज्ञापनावर खर्च केला जातो. ही विज्ञापने बहुतेक वेळा हिंदूंच्या सणांविषयीच असतात; मात्र त्यामध्ये काम करणारे कलाकार हिंदु धर्मियांच्या धार्मिक वैशिष्ट्यांविषयी उदासीन असतात. अशांना वठणीवर आणण्यासाठी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ ही मोहीम राबवली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.
१. विविध उत्पादकांकडून विज्ञापनांमध्ये हिंदूंच्या प्रथा-परंपरा गुंडाळून ठेवणे
हिंदु समाजाचे विविध सणवार आले की, विविध माध्यमांमधून मोठमोठी विज्ञापने झळकण्यास प्रारंभ होतो. अशा विज्ञापनांमध्ये दागदागिन्यांपासून, वस्त्र प्रावरणे, अन्य उत्पादने आदींचा अंतर्भाव असतो. ही विज्ञापने करणारे उत्पादक किंवा अशी विज्ञापने बनवणारी आस्थापने, हिंदूंना गृहीत धरून विज्ञापने करत असल्याचे दिसून येते; परंतु अलीकडे अशा विज्ञापनांना हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. हिंदूंचा उत्सव; पण विज्ञापनामधील ‘मॉडेल’ना मात्र हिंदूंच्या प्रथा-परंपरा गुंडाळून ठेवलेल्या दाखवले जाते. विज्ञापन आस्थापन सांगेल, तसा त्या ‘मेकअप’ (सौंदर्यवर्धन) करणार ! हिंदु सणांच्या विज्ञापनांमध्ये ज्या महिला, मुली मॉडेल म्हणून प्रदर्शित केल्या जातात, त्यांच्या कपाळावर बिंदी दाखवायचा विसर या विज्ञापन उत्पादकांना पडला होता. ‘सण हिंदु धर्माचा, मग त्या समाजाप्रमाणे वेशभूषा, अन्य आभूषणे आणि कपाळावर कुंकू वा टिकली नको का ?’, असा विचार उत्पादकांकडून केला जात नव्हता.
२. ‘नो बिंदी, नो बिझनेस’, या चळवळीमुळे विज्ञापन आस्थापन आणि उत्पादकांमध्ये होत असलेला पालट !
अलीकडच्या काळात ‘नो बिंदी, नो बिझनेस’, अशी चळवळ उभी राहिली आणि अशा विज्ञापनांना तीव्र विरोध होण्यास प्रारंभ झाला. हिंदूंच्या सणांसाठी विज्ञापन करतांना त्या समाजाच्या प्रथा, परंपरा यांचा विचार न करताच ही विज्ञापने केली जात होती. दसरा, दिवाळी आणि अन्य हिंदु सणांच्या वेळी प्रचंड विज्ञापने करायची अन् त्याद्वारे स्वतःची उत्पादने विकून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवायचा; पण असे करतांना ज्या समाजाच्या जीवावर आपण व्यवसाय करत आहोत, त्या समाजालाच गृहीत धरायचे, असे कसे चालेल ? ‘नो बिंदी, नो बिझनेस’, या चळवळीमुळे आता अशा उद्योगांचे आणि विज्ञापने करणार्या आस्थापनांचे डोळे उघडू लागले आहेत. अशी विज्ञापने करणार्यांवर बहिष्कार घालण्याचे वारे वाहू लागल्यानंतर उद्योजक जागे झाले. ‘सण हिंदूंचे; पण विज्ञापनांमध्ये त्याचा मागमूसही नाही ! हिंदूंना समाजास गृहीत धरून चालणार नाही’, असे उत्पादकांना वाटू लागले आहे. त्यातून हिंदु सणांसाठी केल्या जात असलेल्या विज्ञापनांमध्ये पालट होत असल्याचे दिसू लागले आहे.
३. लेखिका शेफाली वैद्य यांनी चालू केलेल्या चळवळीमुळे हिंदूंना अनुकूल अशी विज्ञापने केली जाणे
समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रीय असलेल्या लेखिका शेफाली वैद्य यांनी ही चळवळ चालू केली. ‘फॅब इंडिया’ या आस्थापनाने दिवाळी उत्पादनांचे विज्ञापन करतांना ‘जश्न-ए-रिवाज’ या शीर्षकाखाली विज्ञापने केली. त्यास तीव्र आक्षेप घेण्यात आला. सण हिंदूंचा आणि विज्ञापनाला शीर्षक अन्य समाजाच्या सणास शोभेसे कसे ? असे हिंदुस्थानात कसे चालेल ? ‘फॅब इंडिया’च्या विज्ञापनावर आक्षेप घेतल्यानंतर आस्थापनाने सारवासारव केली. ‘ते विज्ञापन दिवाळीसाठी नव्हते’, असा थातुरमातुर खुलासा केला; पण जो आक्षेप घेण्यात आला, तो लक्षात घेऊन ‘फॅब इंडिया’ने त्यांच्या विज्ञापनाचे नाव पालटले आणि ते ‘झिलमील सी दिवाली’, असे ठेवले ! शेफाली वैद्य यांनी चालू केलेल्या चळवळीस देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. २० लाख लोकांनी त्यास त्वरित प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘प्रसिद्ध उत्पादक आणि त्यांचे विज्ञापन करणारी आस्थापने यांना त्यांची विज्ञापने हिंदूंना अनुकूल असतील, अशी केली पाहिजेत’, असा ‘साक्षात्कार’ झाला, तसेच प्रत्यक्षात तसे घडण्यास प्रारंभही झाला. दिवाळीच्या विज्ञापनांमध्ये हिंदु महिलांच्या कपाळावर कुंकू वा टिकली दिसू लागली. अंगावर परंपरागत वस्त्र प्रावरणे, दागदागिने, हातामध्ये दिवे, पणत्या दिसू लागल्या. हिंदूंच्या परंपरागत चिन्हांचा अशा विज्ञापनांमध्ये समावेश केला जाऊ लागला.
४. आक्षेपार्ह विज्ञापनांविरुद्ध चालू झालेल्या चळवळीचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येणे !
वर्ष २०२० मध्ये टाटा समूहाच्या ‘तनिष्क’ या दागिने निर्माण करणार्या आस्थापानने एक विज्ञापन केले होते. त्यावरूनही गदारोळ निर्माण झाला होता. ते विज्ञापन ‘लव्ह जिहाद’ला प्रवृत्त करणारे असल्याने टीकेची झोड उठवण्यात आली होती. समाजमाध्यमांवर ‘तनिष्क’वर बहिष्कार घालण्याची मोहीम चालू झाली. त्यावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन ‘तनिष्क’ने त्यांचे वादग्रस्त विज्ञापन मागे घेत ‘या वादापासून आम्ही दूर आहोत’, असे घोषित केले होते. गुजरातमध्ये तर ‘तनिष्क’ने हिंदूंची क्षमाही मागितली होती.
अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी विज्ञापने करतांना त्यांच्या परंपरा लक्षात घेऊन विज्ञापने केली जात असल्याचे दिसून येते. मग हिंदु सणांच्या वेळी विज्ञापने करतांना अशी वृत्ती का दिसून येते ? या आक्षेपार्ह विज्ञापनांविरुद्ध चालू झालेल्या चळवळीचा प्रभाव दिसू लागला आहे. वर्ष २०२४ च्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘तनिष्क’ने ‘नव-रानी कलेक्शन’ नावाने स्वतःचे उत्पादन बाजारात आणले आहे. त्यामध्ये हिंदु संस्कृतीची आवर्जून नोंद घेण्यात आली आहे. एखादी सकारात्मक चळवळ कसा पालट घडवून आणू शकते ? आणि मोठमोठ्या आस्थापनांनाही ‘हिंदूंना गृहीत धरून चालणार नाही’, हे दाखवून देते, हे यावरून लक्षात येईल !
– श्री. दत्ता पंचवाघ, मुंबई
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ८.१०.२०२४)
हिंदूंनी अशाच प्रकारे संघटितपणे प्रत्येक क्षेत्रात चळवळ अथवा मोहीम राबवल्यास कुणीही पुरोगामी, निधर्मी, बुद्धीप्रामाण्यवादी वा अल्पसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस करणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक |