केवळ दिखावा नको, सुविधा हव्यात !
कोकण रेल्वेमार्गावरील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग या रेल्वेस्थानकांच्या बाहेरच्या भागाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. विमानतळाच्या धर्तीवर आणि पर्यटनाच्या दृष्टीने पुष्कळ पैसा खर्च करून हे नूतनीकरण केले आहे. सावंतवाडी स्थानकात नवीन बांधकाम आणि सुशोभीकरण करून स्थानिक कोकण संस्कृतीची ओळख करून देणारी चित्रे रेल्वेस्थानकातील भिंतींवर रेखाटण्यात आली आहेत, तसेच दुचाकी वाहने, चारचाकी वाहने आणि रिक्शा यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. एकूणच प्रशस्त परिसर, संस्कृतीची ओळख जपून ठेवत केलेले बांधकाम आणि त्याला आधुनिकतेची दिलेली जोड, यांमुळे रेल्वेस्थानक पाहून प्रसन्न वाटते. असे असले, तरी रेल्वेस्थानकाच्या तिकीटघराजवळून आत फलाटावर गेल्यावर मात्र स्थिती ‘जैसे थे’ अशीच असल्याचे निदर्शनास येते. फलाटाची एकूण रुंदी साधारण ४०० फूट असतांना रेल्वेस्थानकातील पत्र्याची शेड मात्र केवळ ६०-७० फूट लांब आहे. त्यामुळे शेड सोडून उर्वरित भागात रेल्वेचा डबा लागल्यास ऊन-पावसात प्रवाशांची पुष्कळ गैरसोय होते. उन्हाच्या झळा आणि पावसाच्या सरी यांमुळे साहित्य ने-आण करण्यास अडचणी येतात. सावंतवाडी रेल्वेस्थानकात २ फलाट आहेत; परंतु दुसर्या फलाटावर शेडची व्यवस्था नाही. प्रवाशांना बसण्यास बाकड्यांची व्यवस्था अपुरी आहे. सावंतवाडी हे कोकणातील शेवटचे आणि मोठे स्थानक असल्याने येथून प्रवाशांची ये-जा अधिक प्रमाणात चालू असते; परंतु वरील अडचणींमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वेस्थानकांचेही अशाच प्रकारे नूतनीकरण करण्यात आले आहे; परंतु तेथेही फलाटावरील दुरुस्ती न करता केवळ स्थानकाअंतर्गत येणार्या भागाचे आणि बाहेरील परिसराचे नूतनीकरण केले आहे; मात्र आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने त्याला नूतनीकरणापेक्षा ‘सुशोभीकरण’ म्हणता येईल. त्यामुळे ‘दिखावा म्हणून नूतनीकरण आणि खर्च केला आहे का ?’, हा प्रश्न पडतो.
नूतनीकरण केलेल्या रेल्वेस्थानकाच्या परिसरातही प्रवाशांकडून खाऊच्या पाकिटांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या इत्यादी कचरा टाकलेला दिसतो. बाकड्याच्या जवळ प्रवासी सर्रास थुंकतात. लोकांकडूनही मिळालेल्या सुविधांचा योग्य वापर होत नाही. एकंदरीत या सर्वांचा विचार करता प्रशासनाने लोकांना शिस्त लावली आणि दंडाचे प्रावधान केले, तर परिसरातील स्वच्छता राखली जाईल. तसेच प्रशासनानेही केवळ दिखावा म्हणून काम न करता लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.