‘उत्तरदायी साधिका’ म्हणून नव्हे, तर ‘गुरुसेवेसाठी आलेली सेवेकरी साधिका’ या भावाने सेवा करणार्या सुश्री (कु.) सुषमा लांडे (वय ४० वर्षे) !
‘मागील काही वर्षांपासून मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत आहे. येथील स्वयंपाकघरातील सेवांचे दायित्व सुश्री (कु.) सुषमा लांडे या साधिकेकडे आहे. तिच्यासमवेत सेवा करतांना मला तिची अनेक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. १५.१०.२०२४ (आश्विन शुक्ल त्रयोदशी) या दिवशी सुषमाताईचा ४० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ताईची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सुश्री (कु.) सुषमा लांडे यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !
१. साधकांची प्रकृती आणि शारीरिक क्षमता यांचा विचार करून सेवा देणे
स्वयंपाकघरातील सेवांचे नियोजन करतांना सुषमाताई साधकांचा विचार प्राधान्याने करते. साधकांची प्रकृती आणि त्यांची शारीरिक क्षमता यांचा विचार करून ती त्यानुसार सेवा देते.
२. शिस्तबद्धता आणि नियोजन कुशलता
सुषमाताई शिस्तबद्ध रितीने आणि कौशल्याने सेवा करते. स्वयंपाकघरात अनेक सेवा असतात; परंतु साधकसंख्या अल्प असते. असे असूनही ती स्वतःचे, तसेच साधकांचे नामजपादी उपाय अन् सेवा यांचे नियोजन व्यवस्थित करते. स्वयंपाकघरात कितीही अडचणी आल्या, तरी ‘साधकांचे नामजपादी उपाय पूर्ण कसे होतील ?’, याचा ती प्राधान्याने विचार करते आणि त्यानुसार नियोजन करते.
एकदा सुषमाताईच्या मावशी रुग्णाईत होत्या. त्यामुळे त्यांच्या शुश्रूषेसाठी ताई मावशीकडे बाहेरगावी गेली होती. त्या कालावधीत ताई आश्रमात बनवायच्या महाप्रसादातील (भोजनातील) पदार्थांचे प्रमाण तिकडून सांगायची. तिला साधकांची संख्या सांगितली की, ती लगेच ‘पदार्थ किती प्रमाणात लागणार ?’ हे सांगायची. रुग्णसेवा करून आश्रमातील सेवांचे नियोजनही उत्तम प्रकारे करायची. या गोष्टीचे मला विशेष कौतुक वाटायचे.
३. सेवेतून साधकांची साधना व्हावी, ही तळमळ
एकदा एका साधकाला सेवा देतांना ‘माझी सतर्कता कुठे न्यून पडली ?’, हे ताईने लक्षात आणून दिले. ती म्हणाली, ‘‘आपण करत असलेल्या सेवेतून आपली साधना होते का ?’ याकडे आपले सतत लक्ष असायला हवे.’’ मला तिच्या सांगण्यामध्ये ‘मला घडवण्याची तळमळ, आपलेपणा आणि नम्रता’ जाणवली. त्यामुळे तिचे बोलणे माझ्या अंतर्मनापर्यंत गेले. साधकांची साधना व्यय होऊ नये आणि त्यांच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढावी, यांसाठी ताईला पुष्कळ तळमळ असते.
४. उत्तम निर्णयक्षमता असूनही विचारून करण्याची वृत्ती
सुषमाताईमधील हा गुण मला क्षणोक्षणी अनुभवण्यास येतो. ‘स्वतःकडे दायित्व आहे’; म्हणून ती कोणतेच निर्णय स्वतःच्या मनाने घेत नाही. त्या सेवेशी संबंधित असलेल्या साधकाशी बोलून नंतरच ती निर्णय देते. निर्णय देतांना ती ‘संबंधित सेवा, त्याची फलनिष्पत्ती आणि परिणाम’ यांचा विचार करून निर्णय घेते.
५. प्रांजळपणा आणि साधेपणा
ताईमध्ये ‘प्रांजळपणा’ हा गुणही आहे. ‘एखाद्या साधकाबद्दल काय वाटले ?’ हे ती प्रांजळपणे सांगते. ‘उत्तरदायी साधिका’ असल्याचा तिला कधीच अहं नसतो. ‘गुरुसेवेसाठी आलेली एक सेवेकरी साधिका’ या भावाने ती सेवा करते. ती स्वतःच्या चुका समष्टीमध्ये सांगते. तेव्हा ‘आपण उत्तरदायी साधिका आहोत’, असे वेगळेपण तिच्यामध्ये कधीच जाणवत नाही.
६. चुकांविषयी संवेदनशीलता
चुका सांगतांना ताई व्यक्तीनिष्ठतेने न सांगता चुका वस्तुनिष्ठपणे सांगते. काही साधकांमध्ये सेवा उरकण्याची वृत्ती असते. त्या वेळी ताई त्यांच्या चुका लक्षात आणून देते. ती म्हणते, ‘‘आपण सेवा किती करतो ?’, यापेक्षा ‘ती सेवा कशी करतो ?’, याकडे देव पहात असतो.’’
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य यांविषयी भाव
अ. परम पूज्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याविषयी तिच्या मनात अपार भाव आहे.
आ. ‘गुरूंचे कार्य अजून चांगले कसे करू शकतो ?’ असा तिला ध्यास असतो.
८. सुषमाताईच्या सहवासात जाणवलेली सूत्रे
अ. सुषमाताईच्या सहवासात असतांना माझे सेवेविषयीचे चिंतन वाढते. माझ्या मनातील निराशेचे विचार दूर होऊन माझा उत्साह वाढतो.
आ. ताई मला चुका सांगत असतांना ‘ती सांगत नसून तेथे गुरुतत्त्व कार्यरत आहे’, असे मला बर्याच वेळा जाणवते.
परम पूज्य गुरुदेवांनी अशी गुणी साधिका आम्हाला ‘उत्तरदायी साधिका’ म्हणून दिली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘सुषमाताईसारखे गुण आमच्यातही येवोत’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.९.२०२४)