पू. सौरभ जोशी यांची पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी रुग्णाईत असल्याच्या संदर्भात सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता !

पू. सौरभ जोशी

 १. पू. दातेआजींना नळीद्वारे अन्न दिले जात असणे आणि त्याचा त्रास पू. सौरभ जोशी यांनाही होणे 

सौ. प्राजक्ता जोशी

‘३१.७.२०२४ या दिवसापासून पू. सौरभदादा (पू. सौरभ जोशी, ३२ वे संत, वय २८ वर्षे) गळ्याला हात लावून ‘टोचते’ असे सांगत होते. ते विकलांग असल्याने पलंगावर पहुडलेले असतात. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींना (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) नळीद्वारे अन्न दिले जाते’, असे वाचले. तेव्हा मला पू. दादांच्या बोलण्याचा संदर्भ लागला. मी पू. दादांना विचारले, ‘‘पू. दातेआजींना गळ्याला टोचते का ?’’ तेव्हा ते लगेच ‘हो’ म्हणाले.

२. ‘पू. सौरभदादांनी पू. दातेआजींची आठवण काढणे आणि त्याच वेळी पू. दातेआजींसाठी ‘श्री’ असा नामजप करायला सांगितला असणे’, हा एक आश्चर्यजनक संयोग असणे

२.८.२०२४ या दिवशी सौ. ज्योती दाते (पू. दातेआजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांनी मला सांगितले, ‘‘आज पू. आजींसाठी ‘श्री’ हा जप करायला सांगितला आहे.’’

‘पू. सौरभदादा प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ‘श्री’ असे संबोधतात’, याची सौ. ज्योतीताईंना आठवण होऊन त्यांची भावजागृती झाली. ‘पू. दादांनी पू. दातेआजींची आठवण काढणे आणि त्याच वेळी पू. दातेआजींवर उपाय होण्यासाठी ‘श्री’ असा नामजप देणे’, ही एक अद्वितीय अनुभूतीच आहे’, असे आम्हा दोघींना जाणवले.

३. पू. सौरभदादांना पू. दातेआजींचे छायाचित्र दाखवल्यावर त्यांनी छायाचित्राला स्पर्श करणे

१३.८.२०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजल्यापासून पू. सौरभदादा हातात जपमाळ घेऊन एकटक पहात होते. ‘ते नेमके कुठे पहात आहेत ?’, हे आम्हाला समजत नव्हते. जणू ते शून्यात पहात होते. दुपारी ३ वाजल्यापासून त्यांच्या उजव्या डोळ्यातून पाणी वहात होते. पू. दादा सायंकाळी ६ वाजेपर्यंत अतिशय शांतपणे एकटक पहात होते. त्यानंतर ते ‘श्री’ असे म्हणून हसले. काही वेळाने त्यांनी मोठ्याने शीळ वाजवली. पू. सौरभदादांना पू. दातेआजींचे छायाचित्र दाखवल्यावर पू. दादांनी पू. आजी समोर असल्याप्रमाणे छायाचित्रातील पू. आजींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.’

– सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभ जोशी यांची आई), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.८.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.