Canadian MP On Khalistani Attacks : कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांच्‍याकडून चिंता व्‍यक्‍त !

खलिस्‍तानी आतंकवादाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांवर आक्रमण

कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी खलिस्‍तानी आतंकवादाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांवर होणार्‍या आक्रमणाविषयी चिंता व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांनी कायद्याची कार्यवाही (अंमलबजावणी) करणार्‍या यंत्रणांच्‍या अधिकार्‍यांकडे दोषींवर कारवाई करण्‍याची मागणी केली. त्‍यांनी नुकतेच ‘हाऊस ऑफ कॉमन्‍स’ला संबोधित केले. तेव्‍हा त्‍यांनी ही मागणी केली.

१. खासदार आर्य म्‍हणाले की, मार्च २०२३ मध्‍ये ‘रेडिओ ए.एम्. ६००’च्‍या समीर कौशल यांच्‍यावर खलिस्‍तानवाद्यांनी आक्रमण केले होते. फेब्रुवारी २०२२ मध्‍ये खलिस्‍तानशी संबंधित हिंसाचारावर टीका केल्‍याविषयी ‘ब्रॅम्‍प्‍टन रेडिओ’चे निवेदक दीपक पुंज यांच्‍यावर त्‍यांच्‍या स्‍टुडिओमध्‍ये आक्रमण करण्‍यात आले होते.

२. गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रूडो यांनी ब्रिटीश कोलंबियामध्‍ये खलिस्‍तानी समर्थक हरदीपसिंह निज्‍जरच्‍या हत्‍येमध्‍ये भारताचा संभाव्‍य सहभाग असल्‍याचा आरोप केला होता. त्‍यानंतर भारत आणि कॅनडा यांच्‍या संबंधांमध्‍ये गंभीर तणाव निर्माण झाला होता; मात्र भारताने कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचा आरोप फेटाळून लावला होता.

संपादकीय भूमिका

ज्‍या कॅनडाचे पंतप्रधानच खलिस्‍तान्‍यांना उघडपणे पाठीशी घालतात, तेथे त्‍यांच्‍या देशात खलिस्‍तानविरोधी पत्रकारांवर आक्रमण होते, यात आश्‍चर्य ते काय ? संयुक्‍त राष्‍ट्रांनी आता अशा देशांना ‘आतंकवादाचे समर्थक’ ठरवून कठोर कारवाई केली पाहिजे !