दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत !; अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ !

बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत !

ठाणे – येथील जेल तलावासमोरील पुलाखाली आसरा घेतलेल्या गरीब कुटुंबातील ५ महिन्यांच्या बाळाचे अज्ञाताने अपहरण केले. बाळाच्या आईच्या तक्रारीनंतर ठाणेनगर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक विश्लेषण करून ६ घंट्यांच्या आत आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना कह्यात घेतले. बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. जावेद अजमत अली न्हावी, जयश्री नाईक आणि सुरेखा खंडागळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांना हत्येआधी १५ दिवस जिवे मारण्याची धमकी ‘बिश्नोई’ टोळीकडून मिळाली होती. बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. ‘बिश्नोई’ टोळीने काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या पाश्वभूमीवर सलमान खानचे घर असलेल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सलमान खानला पुढील काही दिवस घरात थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

२६ अतिरिक्त ‘उत्सव विशेष’ रेल्वे गाड्या !

भुसावळ – आगामी सण-उत्सव लक्षात घेऊन रेल्वेमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होऊ शकते. ही गर्दी अल्प करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दसरा, दिवाळी आणि छट या सणांसाठी २६ अतिरिक्त ‘उत्सव विशेष’ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर ते काजीपेट जंक्शन (तेलंगाणा) या मार्गावर १७ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्यात येतील.

मुंबईत मनसे कार्यकर्त्याची हत्या !

मुंबई – नवीन गाडी घेण्यासाठी मालाड रेल्वेस्थानकावर गेलेले मनसेचे कार्यकर्ता आकाश माईन यांना एका रिक्शावाल्याने कट मारला. दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा फेरीवाल्यांनी गर्दी जमा केली आणि १० ते १२ जणांनी मनसे कार्यकर्त्यावर आक्रमण केले. यात माईन गंभीर घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले; पण त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ७ घंटे ‘रस्ता बंद’ आंदोलन !

बर्‍हाणपूर (मध्य प्रदेश) – येथील महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आधी करण्यात आलेल्या आंदोलनात आश्वासन मिळूनही त्याची पूर्तता न झाल्याने येथील पत्रकारांनी पुन्हा ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या वेळी सावदा येथील पत्रकार संघटना आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, राजकीय प्रतिनिधी यांनी ७ घंटे हे आंदोलन केले.

संपादकीय भूमिका

अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी !