Raj Thackeray : शरद पवारांचे हात जोडणे खोटे ! – राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई – मी ठाण्यातील सभेत ‘शरद पवार नास्तिक आहेत’, असे म्हटले. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितले आहे की, माझे वडील नास्तिक आहेत. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागले; पण हे हात जोडणेही खोटे आहे. शरद पवार सांगत आहेत की, आमचा पक्ष फोडला. तुम्ही काय केले आयुष्यभर ? १९७८ मध्ये काँग्रेस फोडली, १९९१ मध्येशिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडले. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय ? असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. गोरेगाव येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

अजित पवार आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. भाजप यांना स्वीकारतो तरी कसा ? ते भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते, ‘७० सहस्र कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍या लोकांना जेलमध्ये टाकू.’ पण त्यांना मंत्रीमंडळात टाकले. हे का होत आहे ?, असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला.

राज ठाकरे व शरद पवार

ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा चालू असतांना प्रत्येक वेळी विचारावे लागते की, ‘हा नेता आता कुठे आहे ?’ निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे कि नाही ? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय रहाणार ? अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली !

सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही ? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा कि फोडाफोडीचे राजकारण करणारी असली माणसे पाहिजेत ?, असेही ठाकरे म्हणाले.