नवरात्रीतील यागानिमित्त दौर्यावरून रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्यावर लगेचच आश्रमातील स्वयंपाकघर आणि नवीन यंत्रे पहाणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे या नवरात्रीच्या आरंभी देवीचा महिमा पहायला मिळाला. त्याविषयीची सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. ‘महर्षींनी नाडीवाचनात ‘श्री शाकंभरीदेवी होम’ करायला सांगणे आणि त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघर का पहायचे होते ?’, याचा उलगडा होणे
मे २०२४ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रामनाथी आश्रमात आल्या आणि पुन्हा दौर्यावर गेल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात नवीन यंत्रे बसवली आहेत; पण सेवांच्या व्यस्ततेत ती पहाता आली नाहीत.’’ त्यानंतर नाडीवाचन झाले आणि महर्षींनी नाडीवाचनामध्ये नवरात्रीच्या काळात ‘श्री शाकंभरीदेवी होम’ करायला सांगितले. नाडीवाचन चालू असतांना माझ्या मनात विचार आला आणि मला उलगडा झाला, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघर पहायचे आहे’, असे का म्हणत होत्या.’ ‘जणू श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यापर्यंत सूक्ष्मातून आधीच ती स्पंदने पोचली होती’, असे मला जाणवले. आमचे नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात येण्याचे निश्चित होत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला सारख्या म्हणत होत्या, ‘‘या वेळी आश्रमात गेल्यावर मला स्वयंपाकघराच्या जवळील सर्व परिसर पहायचा आहे.’’
२. नवरात्रीच्या काळात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आश्रमात आगमन
२ अ. आश्रमात पोचताच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी स्वयंपाकघर पहाण्यास जाणे आणि त्या सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ दौर्यावरून रामनाथी आश्रमात पोचल्या. तेव्हा गाडीतून उतरताच त्या स्वयंपाकघर पहाण्यासाठी गेल्या. त्या वेळी त्यांनी धान्य ठेवलेली खोली, भाजीपाला आणि यंत्रे ठेवली आहेत, ती खोली अन् पूर्ण स्वयंपाकघर पाहिले. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ धान्य ठेवलेल्या खोलीत गेल्या. त्या वेळी तेथे धान्य निवडण्याची सेवा करणारे सर्व साधक उभे राहून त्यांना नमस्कार करू लागले. त्यातील बरेच साधक वयोवृद्ध होते. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे माझाच तुम्हाला नमस्कार ! तुम्ही कुणीही उभे राहू नका. माझ्याशी बसूनच बोला.’’ नंतर साधक त्यांच्याशी बसून बोलू लागले. त्यांनी उपस्थित साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांची विचारपूस केली. खरे म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हा सर्वांसाठी गुरुस्वरूप आहेत, तरी त्या सर्वांशी सहजतेने बोलत होत्या.
या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना कसे घडवले आहे’, ते मला प्रत्यक्ष पहायला मिळाले. विभागातील सर्व साधक वयस्कर असल्यामुळे त्यांनी कुणालाही उभे राहू दिले नाही. पूर्वी परात्पर गुरुदेवही कधी आश्रमातील मार्गिकेतून जात असतांना सर्वांना सांगायचे, ‘‘तुम्ही उभे राहू नका. तुम्ही तुमची सेवा करत बसूनच माझ्याशी बोला.’’
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी यंत्रावरून प्रेमाने हात फिरवल्यावर ‘साक्षात् आदिशक्तीने यंत्राला स्पर्श केल्यामुळे आपत्काळात साधकांना अन्न-धान्य न्यून पडणार नाही’, असा विचार येणे : नंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ पीठ चाळण्याच्या यंत्राजवळ गेल्या आणि त्यांनी यंत्रावरून पुष्कळ प्रेमाने हात फिरवला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘साक्षात् आदिशक्तीने या यंत्राला स्पर्श केला आहे. त्यामुळे आपत्काळात जगभरातील सनातनच्या साधकांना अन्न-धान्याची न्यूनता कधी पडणार नाही. साधकांनी केवळ गुरूंवर श्रद्धा ठेवून सेवा आणि साधना करायला हवी.’ यंत्रावरून हात फिरवत असतांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त करत बोलत असाव्यात’, असे मला वाटले. त्यांनी यंत्राला स्पर्श केला. तेव्हा माझ्या मनात आपोआप श्री अन्नपूर्णादेवीचा श्लोक चालू झाला.
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति॥ – अन्नपूर्णास्तोत्र, श्लोक ११
अर्थ : (अन्नधान्याने) सदोदित पूर्ण असणार्या अन्नपूर्णे, शंकराला प्राणप्रिय असणार्या पार्वतीदेवी, ज्ञान आणि वैराग्य यांच्या प्राप्तीसाठी तू मला भिक्षा वाढ.
२ इ. पू. रेखा काणकोणकर यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना स्वयंपाकघरातील सर्व यंत्रे दाखवून त्यांची माहिती सांगणे : त्यानंतर पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत, वय ४६ वर्षे) यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भाजी चिरण्यासाठी घेतलेली यंत्रे दाखवून त्यांची माहितीही सांगितली. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी संपूर्ण स्वयंपाकघर फिरून भाजी चिरण्याची (‘कटिंग’ची) खोली, ‘बॉयलर’(अन्न शिजवण्याचे यंत्र), पोळी आणि भाकरी बनवण्याची यंत्रे, तसेच ‘शीतकपाटामध्ये साहित्य कसे साठवले आहे’, हे सर्व पाहिले.
२ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीतून चांगली स्पंदने येत असून पितळ्याची मूर्ती आता सोन्यासारखी झाली आहे’, असे सांगणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वयंपाक घरातील श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती पाहिली. त्या मूर्तीमधून पुष्कळ चांगली स्पंदने येत होती. त्या म्हणाल्या, ‘‘ही मूर्ती पितळ्याची असली, तरी ती सोन्यासारखी झाली आहे.’’ श्रीमती पुराणिककाकू या साधिका देवीची पूजा करतात. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्यांना आवर्जून बोलावून सर्वांसमोर त्यांचे कौतुक केले.
३. ‘शाकंभरी नवरात्र’ चालू होण्याच्या आधी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी योग्य क्रमाने सर्व विभाग पहाणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘शाकंभरी नवरात्र’ चालू होण्याच्या अगोदर धान्य ठेवलेली खोली, स्वयंपाकघर येथे गेल्या. हे सर्व पहात असतांनाही त्यांचा पहाण्याचा क्रम अगदी योग्य होता. ‘धान्य साठवणूक, धान्य निवडणे, पीठ चाळणे, भाजी कापणे, ‘बॉयलर’ पहाणे, गॅसच्या शेगडीवर भाजी कशी बनवतात, पोळ्या आणि भाकरी यांची यंत्रे पहाणे’, अशा क्रमाने त्या सर्व पहात होत्या. ‘हे आदिशक्तीरूपी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, आम्हा साधकांवर तुमची अखंड कृपा राहू दे. आश्रमातील प्रसाद ग्रहण करून आमच्यामधील भाव, तळमळ आणि श्रद्धा यांमध्ये वाढ होऊ दे’, अशी शाकंभरी नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही साधक प्रार्थना करतो.’
– श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२४)
|