‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।’, या संतवचनाची प्रचीती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. रेल्वेने ‘गोवा ते मुंबई’ प्रवास करत असतांना गुरुकृपेने अनोळखी व्यक्तींनी स्वतःहून साहाय्य करणे
१ अ. रेल्वेतील अनोळखी मुलींनी स्वतःहून आपुलकीने ‘दादर ते मालाड’ परतीचे तिकीट काढून देणे आणि सर्वतोपरी साहाय्य करणे : ‘१.१२.२०२२ या दिवशी मी माझ्या मामाच्या मुलाच्या विवाहासाठी दादर (मुंबई) येथे निघालो. विवाहासाठी जाण्याचा निर्णय अकस्मात् घ्यावा लागल्याने मला रेल्वेचे ‘जनरल’ तिकीट काढून ‘गोवा ते मुंबई’, असा प्रवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा मी तिकीट काढून जनरल डब्यात प्रवेश केला. तिथे गर्दी नसल्याने मला ४ जणांसाठीच्या मोठ्या आसनावर २ – ३ घंटे झोपून प्रवास करता आला. पुढील स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्यावरही मला बसण्यासाठी आसन उपलब्ध होते. त्या डब्यात एकही प्रवासी माझ्या ओळखीचा नव्हता. मी एका सहप्रवाशाला अनौपचारिकपणे सांगितले, ‘‘मी अनेक वर्षांनी मुंबई येथे जात आहे. त्यामुळे दादर स्थानक आल्यावर मला सांगा. तिथून मला मालाड (मुंबई) येथे काकांच्या घरी निवासाला जायचे आहे. दुसर्या दिवशी सकाळी मी परत दादर येथे मामाच्या मुलाच्या विवाहासाठी जाईन.’’ त्या प्रसंगी सहप्रवाशांशी परिचय नसूनही माझ्या मनात त्यांच्याप्रती कुटुंबभावना निर्माण झाली आणि मला वाटले, ‘मी रेल्वेतून प्रवास करत नसून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातच आहे.’
काही वेळाने सहप्रवाशांमधील २ मुलींपैकी एका मुलीने मला सांगितले, ‘‘मघाशी तुमचे बोलणे आम्ही ऐकले. आम्ही दोघी कांदिवली (मुंबई) येथे जाणार आहोत. आमचा भाऊ दादर येथे आम्हाला नेण्यासाठी येत आहे. आम्ही त्याला भ्रमणभाषने संपर्क करून सांगितले आहे, ‘‘तू आमचे ‘दादर ते कांदिवली’, असे रेल्वेचे तिकीट काढतांना आणखी एका व्यक्तीसाठी ‘दादर ते मालाड’ परतीचे (रिटर्न) तिकीट काढ.’’ त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला ‘मालाड ते दादर’, असे रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागणार नाही. आता परतीचे तिकीट काढल्यावर ते २४ घंट्यांपर्यंत चालते.’’ त्यानुसार दादरला उतरून त्या मुलींनी त्यांच्या भावाद्वारे काढलेले परतीचे तिकीट माझ्या हातात दिले. खरेतर मला रेल्वेच्या तिकिटाविषयी नियम ठाऊक नव्हता आणि मी त्या मुलींना ‘माझे ‘दादर ते मालाड’, अशा रेल्वे प्रवासाचे तिकीट काढा’, अशी विनंतीही केली नव्हती; परंतु ‘गुरुदेवांनीच त्या मुलींच्या माध्यमातून साहाय्य केले’, असे मला प्रकर्षाने वाटले. त्यामुळे माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी मनापासून कृतज्ञता व्यक्त झाली. नंतर मीही कुटुंबीय असल्याप्रमाणे त्या मुलींना रेल्वेतून उतरतांना पिशव्या उचलण्यास साहाय्य केले.
१ आ. ‘मालाड ते दादर’ रेल्वे प्रवास करत असतांना अनुभवलेली गुरुकृपा ! : मी मुंबईत गेल्यावर भ्रमणभाषच्या ‘रेंज’चे क्षेत्र पालटल्याने माझ्या भ्रमणभाषचा संपर्क करण्याच्या दृष्टीने काहीच उपयोग होत नव्हता. ही अडचण मालाड येथे गेल्यावर मी काकांच्या मुलाला सांगितली; पण त्यालाही त्यावरील उपाययोजना ठाऊक नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे मला स्थानिक (लोकल) रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्याचा अनुभव नव्हता. एक स्थानिक रेल्वे येताच मी दादरला जाण्यासाठी काही प्रवाशांच्या समवेत लगेच एका डब्यात चढलो. तेव्हा तेथील एका प्रवाशाने स्वतःहून मला आपुलकीने सांगितले, ‘‘तुम्ही आता प्रवासी डब्यात नसून ‘लगेज’च्या डब्यात आहात. तुम्ही पुढच्या (गोरेगाव) स्थानकावर रेल्वे थांबताच खाली उतरून पुढच्या प्रवासी डब्यात जा.’’ त्या प्रवाशाने माझ्या भ्रमणभाषची ‘व्हॅलििडटी’ असूनही भ्रमणभाष बंद असल्याचे ऐकले होते. त्याने स्वतःहून मला सांगितले, ‘‘तुम्ही भ्रमणभाष ‘एरोप्लेन मोड’वर करून पुन्हा सामान्य स्थितीत करा, म्हणजे तुमचा भ्रमणभाष चालू होईल.’’ तसे केल्यावर माझा भ्रमणभाष पूर्ववत् चालू झाला. तेव्हा मी त्या प्रवाशाचे आभार मानले.
त्या वेळी मला वाटले की, गुरुदेवांनीच त्या अनोळखी प्रवाशाद्वारे स्वतःहून मला वरील २ महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. त्याचप्रमाणे मला भ्रमणभाष चालू करण्याची उपाययोजना कळल्यामुळे मुंबईमध्ये मला विविध प्रसंगी त्याचा उपयोग करता आला. त्यामुळे माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. अपरिचित कापड दुकानदाराने प्रथमभेटीतच ‘सनातनचा साधक’ म्हणून ओळखणे आणि सदरा शिवण्यासाठी अनुमाने २ मीटर कापड विनामूल्य देणे
मे २०२३ मध्ये मी कापड खरेदी करण्यासाठी कपड्यांच्या एका दुकानात गेलो होतो. तेव्हा पूर्वपरिचय नसूनही तेथील दुकानदाराने मला विचारले, ‘‘तुम्ही सनातनचे साधक आहात ना ?’’ त्यावर मी होकार दिला. नंतर मी त्यांना मला २ सदरे शिवण्यासाठी न्यून पडत असलेले २ रंगांचे सदर्याचे कापड दाखवले आणि प्रत्येकी अर्धा मीटर कापड विकत देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी मला आवश्यकतेपेक्षा थोडे अधिक (प्रत्येकी अनुमाने १ मीटर) कापड विनामूल्य दिले. ५ दिवसांनी त्या कापडाच्या साहाय्याने शिंप्याने शिवलेले २ अंगरखे घेऊन मी त्या दुकानदाराकडे गेलो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गावाहून आणलेले फणसपोळीचे एक पाकीट ‘प्रेमाची भेट’ म्हणून दिले. तेव्हा ती भेट स्वीकारतांना त्यांनी पुष्कळ जवळीक असल्याप्रमाणे माझेच आभार मानले.
३. अपरिचित व्यक्तीने स्वतःहून दुचाकी गाडीने आश्रमाजवळ सोडणे
ऑगस्ट २०२३ मध्ये काही दिवसांनी मी नागेशी (गोवा) येथून रामनाथी आश्रमाकडे चालत जात असतांना एका व्यक्तीने माझ्या समोर दुचाकी गाडी थांबवली आणि तिने मला सांगितले, ‘‘मी रामनाथी देवस्थानाच्या कार्यालयात नोकरीसाठी जात आहे. मी तिथपर्यंत आपल्याला दुचाकी गाडीवरून नेऊ शकतो. आपण कुठे जात आहात ?’’ तेव्हा मी धोतर नेसलो होतो आणि त्यांच्या दुचाकीवर मागे बसत होतो. तेव्हा ती व्यक्ती जुनी जवळीक असल्याप्रमाणे अतिशय प्रेमाने मला उद्देशून म्हणाली, ‘‘तुम्ही दुचाकीवर सावकाश बसा. तुम्ही सांगितल्यावर आपण निघू !’’ तेव्हा मी त्या व्यक्तीकडे नाव, गाव इत्यादी विचारपूस केली. पुढे नेहमीच मी रामनाथी आश्रमात चालत जात असल्याचे दिसलो, तर ती व्यक्ती स्वतःहून सहजतेने दुचाकी गाडी थांबवते आणि मला दुचाकीने रामनाथी आश्रमाजवळ नेऊन सोडते.
अशा प्रकारे गुरुदेवच मला विविध अनुभूती देऊन क्षणोक्षणी गुरुतत्त्वाची प्रचीती देतात. ‘आपल्या मनातील प्रत्येक विचार त्यांच्यापर्यंत पोचत आहे’, याची ते मला जाणीव करून देतात आणि आवश्यकतेनुसार तशी अनुभूतीही देतात. त्यामुळे त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे मला वाटते.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |