वाळवीचा प्रादुर्भाव होऊन घरातील साहित्य खराब होणे; पण प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी वापरलेले साहित्य सुरक्षित रहाणे
१. डॉ. (सौ.) कुंदा आठवले आणि प.पू. रामानंद महाराज यांनी जोशी कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करणे अन् त्यांनी वापरलेले साहित्य जोशी कुटुंबियांनी सांभाळून ठेवणे
‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले त्यांची कुलदेवता श्री योगेश्वरीदेवीचा कुलाचार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे जायच्या. तेव्हा त्या सोलापूर येथील आमच्या घरी वास्तव्य करायच्या. वर्ष २०१२ मध्ये आमचे सद्गुरु प.पू. रामानंद महाराज गाणगापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट येथे जाण्यासाठी त्यांच्या भक्तांच्या समवेत आमच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या वापरातील भांडी, उदा. ताटे, वाट्या, पेले, चमचे इत्यादी, तसेच काही वस्तू आणि अंथरुणे, पांघरुणे, उशी अन् त्यांचे खोळ हे सर्व साहित्य आम्ही प्लास्टिकच्या वेष्टनांत गुंडाळून आमच्या घरातील देवघर असलेल्या खोलीत पलंगाखालच्या खणांमध्ये ठेवले होते. या वस्तूंच्या बाजूला ठेवणीतील भांडी, अंथरुणे, पांघरुणे इत्यादी साहित्यही ठेवले होते.
२. कोरोना महामारीच्या काळात दीड वर्ष सोलापूरला जाता न येणे, त्यामुळे घरातील वस्तूंना वाळवी लागून त्या खराब होणे; पण प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी वापरलेल्या वस्तूंना चैतन्यामुळे वाळवी न लागणे
सध्या आम्ही ठाणे येथे रहातो आणि अधूनमधून सोलापूरला जातो. वर्ष २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या काळातील दळणवळण बंदीमुळे आम्ही जवळपास दीड वर्ष सोलापूरला जाऊ शकलो नाही. डिसेंबर २०२० मध्ये दळणवळण बंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो. त्या वेळी घराच्या परिसरातील झाडे, घराची लाकडी दारे, तसेच देवघरातील लाकडी पलंग यांवर वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे आम्हाला दिसले. त्यामुळे लाकडी पलंग, त्या खाली खणात ठेवलेले साहित्य, खोके, सतरंज्या आणि उशी यांची अक्षरशः चाळण झाली होती.
ठेवणीतील भांड्यांवर मातीचे डाग पडले होते. ठेवणीतील या साहित्याला दुर्गंध येत होता; परंतु प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांनी वापरलेल्या सर्व वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात सुरक्षित असल्याचे दिसले. या वस्तूंवर वाळवीच्या प्रादुर्भावाचा कोणताही दुष्परिणाम (उदा. वाळवीमुळे डाग पडणे, दुर्गंधी येणे) झाल्याचे दिसले नाही. ‘संतांनी वापरलेल्या या वस्तूंमध्ये चैतन्य निर्माण झाल्यामुळे त्या सर्व वस्तू सुरक्षित राहिल्या आहेत’, असे आमच्या लक्षात आले.’
– जोशी कुटुंबीय, सोलापूर, महाराष्ट्र. (८.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |