प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांसमोर आरती म्हणतांना आलेल्या अनुभूती
आज १४.१०.२०२४ या दिवशी सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘९.३.२०२४ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणपादुका आल्या होत्या. त्या दिवशी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
प.पू. रामानंद महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. दिवसभर आनंद जाणवून भावजागृती होणे
‘मला प्रथमच प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणपादुकांचे दर्शन होणार आणि चैतन्य मिळणार’, या विचाराने दिवसभर आनंद जाणवत होता आणि माझी भावजागृती होत होती.
२. पहिल्यांदाच एकत्रितपणे आरती म्हणण्याची सेवा करत असूनही दोन्ही साधिकांच्या आवाजातील लय जुळून येणे अन् अधिक सराव करावा न लागणे
त्या दिवशी मला आणि आश्रमातील साधिका कु. लीना कुलकर्णी हिला ‘ज्योत से ज्योत जगाओ…।’, ही सद्गुरूंची आरती म्हणण्याची सेवा होती. आम्ही दोघी प्रथमच एकत्रित आरती म्हणण्याची सेवा करणार होतो. आरती म्हणण्यासाठी आम्हाला अधिक सराव करावा लागला नाही. आम्ही दोघी आरती म्हणतांना गुरुकृपेने आमच्या दोघींच्या आवाजातील लय जुळून आली.
३. साधिकांनी अन्यत्र कुठेही न बघता चरणपादुकांकडे पाहूनच आरती म्हणणे
व्यासपिठावर चरणपादुका ठेवलेल्या असतांना आरती म्हणतांना अन्यत्र कुठेही न बघता आम्ही त्या पादुकांकडे पाहूनच आरती म्हणू लागलो. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचे शिष्य अन् आश्रमातील सर्व साधक असे सर्वजण आरती भावपूर्ण म्हणत होते.
४. आरती म्हणण्याच्या सेवेच्या निमित्ताने १९ वर्षांपूर्वी आलेल्या अनुभूतीचे स्मरण होणे
४ अ. १९ वर्षांपूर्वी वडिलांच्या समवेत प्रथमच दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी जाणे : या सेवेच्या निमित्ताने मला साधारण १९ वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभूतीचे स्मरण झाले. वर्ष २००५ मध्ये मी प्रथमच माझ्या वडिलांच्या समवेत (कै. नारायण रामकृष्ण मुळ्ये, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५९ वर्षे) पनवेलमध्ये सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी गेले होते.
४ आ. कुठेही भजन लावलेले नसतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेल्या भजनातील ओळ स्पष्टपणे ऐकू येणे आणि ‘ही नादाची अनुभूती आहे’, असे वडिलांनी सांगणे : आम्ही पहिले दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचकांच्या दाराला लावले आणि जिना उतरत असतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेले ‘वंदू या निखिल ब्रह्म अवधूता ।। धृ. ।। उत्पत्ती-लय लेश न ज्याला ।।’ ही भजनाची ओळ मला स्पष्टपणे ऐकू आली. तसे मी बाबांना सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘मला तर ऐकू आले नाही. तुला इथे कसे ऐकू आले ?
आपण आता जिथे दैनिक ‘सनातन प्रभात’ दिले, त्या वाचकांना विचारूया. त्यांनी त्यांच्या घरी भजने लावली आहेत का ?’’ त्या वाचकांनी ‘आम्ही भजने लावली नाहीत’, असे मला सांगितले.
तेव्हा बाबांनी सांगितले, ‘‘ही नादाची अनुभूती आहे. तू सेवेला आरंभ केलास आणि तुला देवाने अनुभूती दिली. आता सेवा चालू ठेव.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
४ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेल्या अनुभूतीतून ‘भगवंताला सतत वंदून सतत सेवारत रहायला पाहिजे’, हे शिकायला मिळणे : नंतर मी समष्टी सेवेला आरंभ केला. प.पू. भक्तराज महाराज यांनी मला दिलेली ही अनुभूती मी कधीच विसरू शकत नाही. तो त्यांनी दिलेला आशीर्वादच होता.
प.पू. बाबांच्या भजनातील या ओळींचा भावार्थही हेच सांगतो की, ‘उत्पत्ती-लय लेश न ज्याला ।’ अर्थ : ‘परब्रह्माला आरंभ आणि शेवट नाही’, अशा या भगवंताला ‘आपण सतत वंदून सेवारत रहायला पाहिजे’, हे मला या अनुभूतीतून शिकायला मिळाले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपल्या कृपेमुळे मला सर्व अनुभूती आल्या’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |