Genocide Of Bangladeshi Hindus : बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंच्‍या वंशविच्‍छेदाचा फ्रान्‍समध्‍ये निषेध !

‘पॅरिस महामाया पूजा परिषदे’ने आयोजित केला होता निषेधाचा कार्यक्रम !

मेणबत्त्या पेटवून निषेध आंदोलन करतांना (१) श्री. दीपन मित्रा आणि अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ

पॅरिस (फ्रान्‍स) – येथील ‘पॅरिस महामाया पूजा परिषदे’कडून दुर्गापूजेच्‍या कार्यक्रमात बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंच्‍या चालू असलेल्‍या वंशविच्‍छेदाचा निषेध करण्‍यासाठी आंदोलन करण्‍यात आले. या वेळी भारत, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील १ सहस्राहून अधिक हिंदू उपस्‍थित होते.

फ्रान्‍समधील हिंदू बांगलादेशातील हिंदूंच्‍या दुरवस्‍थेवरून चिंतित असल्‍याने पॅरिस महामाया पूजा परिषदेने ११ ऑक्‍टोबरला स्‍थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते, अशी माहिती ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’ या संघटनेचे ‘युरोपीयन युनियन चॅप्‍टर’चे अध्‍यक्ष श्री. दीपेन मित्रा यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

या प्रसंगी पॅरिस महामाया पूजा परिषदेचे अध्‍यक्ष श्री. सुकांता सरकार म्‍हणाले की, बांगलादेशात केवळ हिंदूंवरच आक्रमणे होत नाहीत, तर बांगलादेशातून अल्‍पसंख्‍यांक हिंदूंना बाहेर काढण्‍याची प्रक्रियाही चालू आहे. बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदू आणि बौद्ध यांची सुरक्षा सुनिश्‍चित करण्‍याची आम्‍ही बांगलादेश सरकारकडे मागणी केली आहे.

पूर्णा शर्मा यांनी नमूद केले की, वर्ष १९७१ पासून आजपर्यंत बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत आहेत. ५ ऑगस्‍ट २०२४ या दिवशी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्‍यागपत्र दिल्‍यानंतर आणि देश सोडल्‍यानंतर मात्र अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवरील आक्रमणे आणि मंदिरांची तोडफोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’चे ‘युरोपीयन युनियन चॅप्‍टर’चे अध्‍यक्ष दीपन मित्रा म्‍हणाले की, बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदू, बौद्ध आणि आदिवासी आज संकटात आहेत. त्‍यांच्‍यावरील आक्रमणाच्‍या प्रत्‍येक घटनेतील गुन्‍हेगारांना निष्‍पक्ष चाचणी आणि कठोर शिक्षा देण्‍याची मी मागणी करतो. बांगलादेशातील असाहाय्‍य हिंदूंच्‍या पाठीशी उभे रहाण्‍याचे आवाहन त्‍यांनी जगातील सर्व जनतेला केले.

निषेध आंदोलनाचे स्‍वरूप !

१. वर्ष १९७१ पासून आजपर्यंत मारल्‍या गेलेल्‍या सर्व निष्‍पाप हिंदूंचे स्‍मरण करण्‍यासाठी आणि बांगलादेशातील हिंदु मुली अन् महिला यांच्‍यावर झालेल्‍या राक्षसी अत्‍याचारांच्‍या विरोधात एक मिनिटाचे मौन पाळण्‍यात आले.

२. हिंदूंच्‍या छळाचा निषेध करण्‍यासाठी मेणबत्त्याही पेटवण्‍यात आल्‍या.

३. पॅरिस महामाया पूजा परिषदेचे अध्‍यक्ष श्री. सुकांता सरकार, सरचिटणीस श्री. अमर मुझुमदार, मुख्‍य सल्लागार श्री. अवनी दास, श्री. रिपन देबनाथ आणि श्री. संजीव सरकार यांनी निषेध सभेला संबोधित केले.