भारत शत्रूराष्‍ट्रांवर लक्ष ठेवण्‍यासाठी ५२ उपग्रह प्रक्षेपित करणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्‍नई (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समितीने अंतराळावरून शत्रूराष्‍ट्रांवर पाळत ठेवण्‍याच्‍या प्रकल्‍पाच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍याला संमती दिली. याअंतर्गत ५२ उपग्रह पृथ्‍वीच्‍या खालच्‍या कक्षेत स्‍थापित केले जाणार आहेत. यांद्वारे चीन आणि पाकिस्‍तान यांच्‍या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यात येणार आहे.

हे उपग्रह भारतीय सैन्‍यासाठी फार उपयुक्‍त ठरतील. हे सर्व उपग्रह कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित असतील, म्‍हणजे हे उपग्रह एकमेकांशी संवाद साधू शकतील. या उपग्रहांची किंमत २७ सहस्र कोटी रुपये आहे. ‘इस्रो’कडून २१ उपग्रह सिद्ध केले जातील, तर ३१ उपग्रह खासगी आस्‍थापने सिद्ध करणार आहेत.