भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी समृद्ध आणि प्रगल्भ करूया ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास यांसाठी होणारे मराठी भाषाभवन उत्तम अन् दर्जेदार व्हावे, भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चर्नी रोड येथील जवाहर बालभवन परिसरात येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषाभवनाच्या इमारतीचे भूमीपूजन १३ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी विधानसभेचे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मराठी भाषाभवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली आहे. भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन, संशोधन आणि प्रसार यांसाठी अधिक बळ मिळेल. भाषाभवनसाठी साहित्यिकांसह अन्य क्षेत्रांतून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी जे-जे करता येईल, ते केले जाईल.’’

मराठी भाषिक आणि साहित्यिक यांना अभिमान वाटेल, असे भाषाभवन उभारले जाईल ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास यांसाठी शासनाद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुंबईत येणार्‍या साहित्यिकांच्या निवासाची सुविधा व्हावी, यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधण्यात येणार आहे. सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, तसेच प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार आहे. भाषाभवनही मराठी भाषिक आणि साहित्यिक यांना अभिमान वाटेल, असे उभारले जाईल.