हिंदुत्वांविषयी अभिमान निर्माण करण्याचे रा.स्व. संघाचे कार्य मोठे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे

मुंबई – भारताला स्वत:ची मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि त्यांच्या एकत्रीकरणाचे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. समाजामध्ये राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांविषयी अभिमान निर्माण करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मोठे आहे, असे गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. दसर्‍याच्या दिवशी ९९ वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतक वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी ‘एक्स’ खात्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम मला कायमच अचंबित करते. देशात कोणतही नैसर्गिक आपत्ती आली, तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे असतो, हे मी अनेकदा पाहिले आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणे, तिथे राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो हे मला ठाऊक आहे. मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत एखाद्या संघटनेने १०० वर्षे काम करणे हे सोपे नाही. जगाच्या इतिहासात एखादी संघटना १०० वर्षे टिकली आणि तरीही तिचा विस्तार चालू आहे. ती कार्यशील असेल, असे माझ्या पहाण्यात आलेले नाही. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’’