जळगाव येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा यांचा संयुक्त उपक्रम !
जळगाव, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा’चे अध्यक्ष सचिन नारळे आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांच्या संकल्पनेतून महिला वर्गास बळ देण्यासाठी, त्यांना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी विजयादशमीच्या निमित्ताने जळगाव शहरात प्रथमच रणरागिणी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
जळगाव शहराच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. केतकीताई पाटील, तसेच सरकारी अधिवक्त्या अनुराधा पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या कु. सायली पाटील, सौ. सुमित्रा पटेल, विधीज्ञ अनुराधा वाणी या प्रमुख रणरागिणींनी शस्त्रपूजन करून उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी दंडसाखळी, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार चालवणे, कराटे यासारखे स्व-संरक्षण करणारे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. दिव्या पाटील यांनी केले. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी यांचे सहकार्य लाभले. ‘हा उपक्रम यापुढे प्रतीवर्षी आयोजित करण्यात येईल’, असे आयोजकांनी सांगितले.