प्रदूषण करणार्या आस्थापनाचे वीज आणि पाणी बंद करण्याचा आदेश !
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
पुणे – औद्योगिक क्षेत्रातील ‘आस्क’ या रासायनिक आस्थापनाने हवा आणि जलप्रदूषण केल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या आस्थापनावर कारवाई केली. आस्थापनाला उत्पादन बंद करण्याची नोटीसही मंडळाने पाठवली आहे. या आस्थापनाकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीअन्वये मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकार्यांनी आस्थापनाला भेट देऊन अन्वेषण केले असता नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. मंडळाने निर्देश देऊनही आस्थापनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने ‘आस्थापनाला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले असून पुढील अनुमती मिळाल्याविना आस्थापनाने उत्पादन चालू करू नये. असे केल्यास आस्थापनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे. आस्थापनाची वीज आणि पाणीपुरवठा थांबवण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. आस्थापनाने हवा आणि जलप्रदूषण करून अनुमतीची मुदत उलटून गेल्यावरही उत्पादन चालूच ठेवले, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनावर कठोर कारवाई करून त्याचा उत्पादन करण्याचा परवानाच रहित केल्यास नियम पाळले जातील. नियम पाळण्यासाठी नसून उल्लंघन करण्यासाठीच बनवले असल्याची मानसिकता यामुळे ठेचली जाईल ! |