नात्यांतील ‘नकोसे’पणा !
एका सामाजिक माध्यमावर एका महिलेने एक विज्ञापन दिले होते. त्यात तिने म्हटले होते, ‘माझ्या लहान बाळाला सांभाळण्यासाठी एक आजी हवी आहे. आमच्या घरात कुणीच मोठे नाही. त्यामुळे कुणीतरी मोठी व्यक्ती असली, तर चांगले होईल. यासाठी कुणी इच्छुक असल्यास त्यांना मी आयुष्यभर सांभाळायला सिद्ध आहे. एखाद्या स्त्रीला तिची सासू नकोशी झाली असेल किंवा एखादी सासू सुनेसमवेत रहायला कंटाळली असेल, तर अशांनी मला संपर्क करावा. त्यांनी माझ्या बाळाला विनामूल्य सांभाळावे. मी त्यांना मोबदला देणार नाही; पण त्यांची सर्व काळजी घेईन.’ अशा स्वरूपाचे विज्ञापन वाचून आश्चर्य वाटते. एखाद्या घरात नकोशी झालेली स्त्री या बाईला तिच्या स्वार्थासाठी हवी आहे आणि त्यात विशेष म्हणजे ती आयुष्यभर तिचा सांभाळ करणार ! सध्या सख्खे असूनही कुणी कुणाला विचारत नाही, एकमेकांचे पटत नाही. असे असतांना ‘परकी स्त्री दुसर्या घरात विनामोबदला बाळाला सांभाळण्यासाठी कशी राहू शकते ? ती बाळावर आजीची माया कशी करणार आणि तेही आयुष्यभर ?’, या सर्व सूत्रांवरून अनेक महिलांनी विज्ञापन देणार्या या महिलेवर टीका केली. हे विज्ञापन एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पहाता येईल; पण त्यातील नातेसंबंधांच्या दृष्टीनेही विचार करायला हवा.
एक स्वार्थी स्त्री दुसर्या स्त्रीलाही स्वार्थी विचार करण्यास भाग पाडत आहे, हे यातून दिसून येते. हे कशाच्या बळावर होऊ शकते ? आज नात्यांची वेलवीण दिवसेंदिवस सैल होत चालली आहे. नाती जपणे, ती खुलवणे, नात्यांचा पाया भक्कम असणे, हे सध्याच्या जगात दिसून येत नाही. त्यामुळे नात्याची इमारत डळमळीत झालेली आहे. याचीच परिणती अशा स्वरूपाच्या विज्ञापनांतून दिसून येते. ‘सासू नकोशी होते’, इथपर्यंत ठीक होते; पण ‘त्या नकोशा सासूला अमुक ठिकाणी पाठवा’, असे विज्ञापनाद्वारे सांगणे ही कोणत्या विचारसरणीची परिसीमाच म्हणावी लागेल. स्वतःची गरज भागवण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाण्याचा विचार करू शकतो. ‘माझ्या बाळाला आजीच्या मायेने सांभाळण्यासाठी एक स्त्री हवी आहे. माझ्या कुटुंबात मोठे कुणी नाही. जी कुणी स्त्री इच्छुक असेल, तिने मला संपर्क करावा’, अशा प्रकारे ते विज्ञापन प्रसारित करायला हवे होते; पण झाले वेगळेच ! पूर्वीच्या काळी कुटुंबव्यवस्था भक्कम होती. त्यामुळे काही सांगायच्या आतच प्रत्येक जण एकमेकांना साहाय्य करत होता. अशी विज्ञापने देण्याची वेळच येत नसे. आता कुटुंबव्यवस्थेला सुरूंग लागल्याने ही वेळ उद्भवली आहे. याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. नाती टिकवा. ती वृद्धींगत करा. हेवेदावे न करता नात्यांतील आनंद जोपासा. नाते ‘नकोसे’पेक्षा ते ‘हवेहवेसे’ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.