मुंबई महापालिकेकडून ७ महिन्यांत अस्वच्छता करणार्या सव्वा लाखांहून अधिक जणांवर कारवाई !
मुंबई – महापालिकेकडून अस्वच्छता पसरवणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या ७ महिन्यांत वॉर्ड स्तरावरील उपद्रव शोधपथक आणि ‘क्लीन अप मार्शल’नी (अस्वच्छता करणार्यांना पकडून दंड करणार्यांनी) केलेल्या कारवाईत १ लाख २५ सहस्र जणांवर कारवाई केली. या कारवाईतून ३ कोटी ५६ लाख ६२ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.
जेवढी दंड आकारणी होते, त्यात ५० टक्के महसूल महापालिकेला, तर उर्वरित महसूल संबंधित खासगी संस्थेला मिळतो. अस्वच्छता पसरवणार्यांवर वेगवेगळ्या कारणांसाठी १०० रुपयांपासून १ सहस्र रुपयांपर्यंत दंड आकारणी केली जात आहे. यामध्ये कचरा फेकणे किंवा थुंकल्यास २०० रुपये दंड आहे. तसेच रस्त्यावर स्नान करणे, शौचास बसून घाण करणे, पक्ष्यांना अन्न खाऊ घालणे, रस्त्यावर वाहन धुणे, दुरुस्त करणे आदींसाठीही दंड केला जात आहे.
दंडात्मक कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने होते. महापालिकेच्या सी.एस्.एम्.टी., चर्चगेट रेल्वे परिसर, कफ परेड, कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया आदी परिसर असलेल्या ए वॉर्डमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कारवाई झाली आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानेही ‘ए’ वॉर्डमध्ये सर्वाधिक ४२ सहस्र जणांवर कारवाई केली आहे.
संपादकीय भूमिका :महासत्ता होऊ पहाणार्या देशातील नागरिकांना ‘अस्वच्छता करू नका’ हेही शिकवावे लागणे लज्जास्पद ! |