श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बालाजी मंदिर हटवल्याचा भाविकांचा आरोप !
पंढरपूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे. काही कृतींमध्ये मात्र धर्मशास्त्रसंगत कृती होत नसल्याचा आरोप भाविकांकडून होत आहे. मंदिरातील बाजीराव पडसाळी समोरील बालाजीचे पुरातन दगडी मंदिर हटवण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. अनेक भाविक विठ्ठलदर्शनासाठी हमखास पंढरपूरला येतात. आंध्रप्रदेशातूनही विठ्ठलदर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. विठ्ठलदर्शनानंतर भाविक येथील बालाजीचे मनोभावे दर्शन घेतात; मात्र मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बालाजीचे दर्शन दुर्लभ झाले आहे.
यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘‘श्री विठ्ठल मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याची मला माहिती नाही. जर मंदिर हटवण्यात आले असेल, तर तो मंदिराच्या संवर्धनाच्या कामातील एक भाग असेल. त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे. मंदिर संवर्धनाचे काम संथगतीने चालू आहे हे खरे आहे. लवकरच या संदर्भात मंदिर समितीची बैठक होणार आहे. संबंधित ठेकेदारालाही काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.’’
बालाजीच्या मंदिरासह सर्वच देवतांचे जतन कसे केले जाते ? याची वस्तूस्थिती पारदर्शीपणे समोर आली पाहिजे ! – ह.भ.प. वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ
मंदिराचे संवर्धन कार्य चालू आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम चालू आहे. याचा अधिकृत आराखडाही प्रसिद्ध केलेला आहे; मात्र मंदिर समिती व्यवस्थापनाचे वर्तन कायमच संशयास्पद राहिलेले आहे, उदा. मंदिर संवर्धन करतांना पुरातत्व विभागाकडून दिलेल्या सूचनेनुसार गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्यात आले; मात्र मंदिरातील पुरातन चांदीकाम काढण्याच्या कोणत्याही सूचना ना पुरातत्व विभागाच्या होत्या ना अधिकृत आराखड्यात याचा उल्लेख होता. मनमानी पद्धतीने ऐतिहासिक असे चांदीकाम काढले. यापूर्वी दळणवळणबंदीच्या काळात अशाच मनमानी पद्धतीने सभामंडपातील गरुड आणि हनुमंतराय यांचे मंदिर काढून त्या मूर्ती चौखांबीत अक्षरशः चिटकवल्याप्रमाणे बसवल्या आहेत. याच पद्धतीने मंदिरातील ज्या परिवार देवता आहेत. ज्यात व्यंकटेश आणि इतर देवतांच्या मूर्ती, मंदिरे ही संवर्धनासाठी काढली आहेत; पण ती पूर्ववत् बसवतांना कोणतीही अधिकृत माहिती मंदिर समितीने प्रसिद्ध केलेली नाही. (आम्ही विधीवत् मूर्ती काढून ठेवल्या आहेत त्या लवकरच बसवू, एवढीच जुजबी माहिती दिली जाते.)
संवर्धनासाठी ज्या वेळी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार होता, त्या बैठकीत मंदिर समितीच्या बैठकीत वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने मी स्वतः ‘व्यंकटेश मंदिर आपण काढणार आहात असे कळाले आहे ही गोष्ट खरी आहे का ?’ असा प्रश्न विचारला असता ‘असे काहीच होणार नसल्या’चे मंदिर समिती सहअध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगितले होते; मात्र घडले वेगळेच.
ज्या पद्धतीने मंदिर सरकारने कह्यात घेतले आहे, तेव्हा मंदिरातील प्रत्येक घडणार्या गोष्टीचे उत्तरदायित्व सरकारचे आहे; मात्र सरकारमधील सर्व विभागाचे मंत्री, त्यांचे नातेवाईक, प्रशासकीय अधिकारी यांना येथे दर्शन आणि सत्कार झाला कि धन्य वाटते. बाकी कारभाराची चौकशी कुणीही करत नाही. त्यामुळे समिती सदस्य, कर्मचारी, एकूणच व्यवस्थापन हे ‘आपण काहीही केले, तरी आपले कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही’ या अविर्भावात वावरतात. हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत, हे नक्की आहे.