पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत नवरात्रीच्या कालावधीत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरतांना आलेल्या अनुभूती !
‘आश्विन शुक्ल नवमी (२३.१०.२०२३) या दिवशी मला सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१. ग्रामदेवतेच्या मंदिरात गेल्यावर आलेल्या अनुभूती
१ अ. पू. (सौ.) अश्विनीताईंमधील चैतन्याने पुजार्याने घाई न करता शांतपणे ओटी भरण्याची अनुमती देणे : ‘आम्ही ग्रामदेवतेच्या मंदिराच्या गाभार्यात पोचल्यावर तेथील पुजार्याने ‘देवीची ओटी ताटातच ठेवा आणि मग आत या’, असे आम्हाला सांगितले. तो आम्हाला ओटी भरण्याची घाई करत होता. तेव्हा पू. ताईंनी मला सांगितले, ‘‘आपण योग्य पद्धतीनेच ओटी भरूया.’’ पू. ताईंनी पुजार्याला सांगितले, ‘‘आम्ही ताटात ओटी न ठेवता प्रत्यक्ष देवीची ओटी भरतो.’’ तेव्हा त्याच्या विचारांत पालट होऊन त्याने आम्हाला शांतपणे ओटी भरण्याची अनुमती दिली. आमची देवीची ओटी भरून होईपर्यंत गाभार्यात येणार्या स्त्रियाही बाहेर थांबल्या होत्या. त्यामुळे आम्हाला देवीची ओटी शांतपणे भरता आली.
१ आ. पू. (सौ.) अश्विनीताई देवीची ओटी भरत असतांना मला देवीचे चैतन्य मोठ्या प्रमाणात जाणवत होते आणि ‘पू. ताई प्रार्थना करत असतांना ‘देवी त्यांना आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.
१ इ. ‘पू. (सौ.) अश्विनीताईंच्या मनातील विचार देवीने ऐकला’, असे वाटणे : ‘भक्तांकडून देवीला अर्पण केलेल्या साडीवर तेल सांडू नये किंवा साडीला उद्बत्ती लागू नये’, असे पू. ताईंना वाटत होते. त्याच वेळी मंदिरातील एका सेविकेने तेथील अन्य स्त्रियांनी ठेवलेले ओटीचे साहित्य उचलून ठेवले. तेव्हा ‘देवीने पू. ताईंच्या मनातील विचार ऐकला’, असे मला वाटले.
१ ई. पू. (सौ.) अश्विनीताई देवीची ओटी भरत असतांना ‘एक देवी दुसर्या देवीची ओटी भरत आहे’, असे मला जाणवत होते.
२. जरीमरीदेवीच्या मंदिरात गेल्यावर आलेल्या अनुभूती
२ अ. पुष्कळ स्त्रियांनी देवीची ओटी भरणे; परंतु पुजार्याने केवळ पू. (सौ.) अश्विनीताईंनी भरलेल्या ओटीतील साडीच देवीला नेसवणे : जरीमरीदेवीच्या मंदिरात एक जरीआई आणि दुसरी मरीआई या दोन देवी आहेत. तेथील पुजार्याने पू. ताईंनी दिलेल्या साड्या दोन्ही देवींना नेसवल्या. पू. ताईंनी दिलेले सौभाग्यालंकार देवीला न घालता आरशात दाखवले. तेथे पुष्कळ स्त्रियांनी देवीची ओटी भरली होती; पण त्या पुजार्याने केवळ पू. ताईंनी भरलेल्या ओटीतील साडीच देवीला नेसवली. तेव्हा पू.(सौ.) ताई म्हणाल्या, ‘‘देवीलाच हे सर्व आपल्याकडून करून घ्यायचे होते. त्यामुळे देवीने त्या पुजार्याच्या मनात हा विचार घातला.’’
२ आ. पू. (सौ.) अश्विनीताईंमधील ‘देवीतत्त्व जागृत झाले आहे’, असे जाणवणे : देवळातील पुजार्याने तेथून निघतांना आम्हाला देवीचे कुंकू दिले. ते कुंकू पू. (सौ.) ताईंनी कपाळावर लावल्यावर त्यांच्यातील ‘देवीतत्त्व जागृत झाले आहे’, असे मला जाणवले.
२ इ. जरीमरीदेवीच्या मंदिरात त्या दिवशी यज्ञ झाला होता. पू. (सौ.) अश्विनीताईंनी त्या यज्ञाचे भावपूर्ण दर्शन घेतले.
३. आम्ही आश्रमात परत येतांना आश्रमाजवळील पुलाजवळ गर्दीची वेळ असूनही त्या वेळी रहदारी नव्हती. त्यामुळे आम्ही लवकर आश्रमात पोचलो.
४. आश्रमात परत आल्यावर ‘पू. ताईंचे डोळे पुष्कळ तेजस्वी झाले होते’, असे मला जाणवले.
५. या कालावधीत माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक लाभ झाले. मला पुष्कळ शांत आणि आनंदी वाटत होते. माझी ही स्थिती पुष्कळ वेळ टिकून होती.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. (सौ.) अश्विनीताई, ‘तुमच्यामुळे मला देवीचे चैतन्य अनुभवता आले’, याबद्दल तुम्हा दोघांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. राधा साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२३.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |