Promotion Of Mahakumbha : जगातील सर्व १९६ देशांमध्‍ये केला जाणार प्रयागराज महाकुंभाचा प्रचार !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे जानेवारीत आरंभ होणार्‍या महाकुंभाची सिद्धता आता युद्धस्‍तरावर चालू आहे. प्रयागराज संगमाच्‍या भूमीवर होणार्‍या या महामेळ्‍याचा प्रचार जगातील सर्व १९६ देशांमध्‍ये केला जाणार आहे. प्रयागराज मेळा प्राधिकरणाने याची एक व्‍यापक कार्ययोजना निश्‍चित केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या शुभहस्‍ते महाकुंभाचा ‘लोगो’ (चिन्‍ह) आणि संकेतस्‍थळ यांचे लोकार्पण झाल्‍यानंतर आता त्‍याचा जागतिक स्‍तरावर प्रचार करण्‍यात येणार आहे. परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या ‘एन्.आर्.आय.’ (अनिवासी भारतीय) विभागाकडून प्रमुख देशांच्‍या भारतीय दूतावासांद्वारे ‘रोड शो’चे आयोजन करण्‍यात येणार आहे.

१. अमेरिका, इंग्‍लंड, ऑस्‍ट्रेलिया, स्‍वित्‍झर्लंड, कॅनडा, मॉरिशस, मालदीव, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, जर्मनी या देशांसह सर्वच १९६ देशांमध्‍ये प्रचार अभियान चालवले जाईल.

२. याने केवळ जागतिक स्‍तरावरील पर्यटकांना या महाकुंभाची माहितीच मिळावी, असा उद्देश नसून त्‍यांनी प्रयागराज येथे प्रत्‍यक्ष महाकुंभाला यावे, हाही उद्देश समोर ठेवण्‍यात आला आहे. यासह विश्‍वातील कोट्यवधी सनातन धर्मियांना महाकुंभाशी जोडण्‍याचा प्रयत्न केला जाईल.

३. याआधी वर्ष २०१९ मध्‍येही कुंभमेळ्‍याशी संबंधित ‘रोड शो’ जगातील सर्व देशांमध्‍ये झाले होते. त्‍या वेळी ७२ देशांचे राजनैतिक अधिकारी, तसेच सर्व १९६ देशांतून पर्यटक प्रयागराजला आले होते.