P.P. Mohan Bhagwat : हिंदूंनो, दुर्बल आणि असंघटित राहू नका; संघटित व्‍हा !  

  • राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे शतकमहोत्‍सवी वर्षात पदार्पण

  • सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांचे विजयादशमीच्‍या भाषणात आवाहन

नागपूर – बांगलादेशामध्‍ये हिंदु समाजावर अत्‍याचारांच्‍या घटनांची पुनरावृत्ती होत आहे. कुठे काही गडबड झाली की, दुर्बलांवर राग काढण्‍याची कट्टरतावाद्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्‍हे, सर्वच अल्‍पसंख्‍यांकांच्‍या डोक्‍यावर ही तलवार टांगती राहणार आहे. हिंदूंच्‍या लक्षात यायला हवे की, दुर्बल रहाणे, हा अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत, याचा अर्थ आपण अत्‍याचाराला निमंत्रण देत आहोत. मग त्‍यासाठी कोणत्‍याही कारणाची आवश्‍यकता नाही. आपण दुर्बल आहोत हेच निमित्त आहे. त्‍यामुळे जिथे आहात, तिथे संघटित राहा. कुणाशी शत्रुत्‍व करू नका. हिंसा करू नका; पण याचा अर्थ दुर्बल रहाणे नाही. हे आपल्‍याला करावेच लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले. १२ ऑक्‍टोबर या दिवशी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने १०० व्‍या वर्षात पदार्पण केले. त्‍यानिमित्ताने नागपूरमधील मुख्‍यालयात विविध प्रकारच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी ते बोलत होते.

ओटीटी माध्‍यमांवर कायद्याचे नियंत्रण हवे !

ओटीटी (ओटीटी म्‍हणजे ‘ओव्‍हर दी टॉप’. या माध्‍यमातून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाता येतात.)माध्‍यमांवर ज्‍या गोष्‍टी दाखवल्‍या जातात, ते सांगणेही अभद्र ठरेल इतके बीभत्‍स असते. त्‍यामुळेच या सगळ्‍यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे. संस्‍कार भ्रष्‍ट होण्‍यामागचे एक मोठे कारण तेही आहे.

माध्‍यमांनी दायित्‍वाने वर्तन केले पाहिजे. त्‍यांच्‍या कृतीतून त्‍यांनी समाजाची धारणा, आणि मांगल्‍य कायम राखणार्‍या मूल्‍यांचे पोषण व्‍हायला हवे. किमान या गोष्‍टींना धक्‍का लागेल, असे काम करायला नको, असेही सरसंघचालक म्‍हणाले.

सरसंघचालकांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे

१. महाविद्यालयांमध्‍ये शिक्षण म्‍हणजे प्रबोधन होते. त्‍याचा आरंभ जिथून होतो, त्‍या शिक्षक-प्राध्‍यापकांच्‍या प्रशिक्षणाचा मार्ग शोधावा लागेल.

२. समाजातील महनीय लोक जसे वागतात, तसे इतर सामान्‍य लोक वागत असतात. त्‍यामुळे प्रभावी लोकांना याची काळजी असायला हवी.

३. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्‍याही देशाने जगाच्‍या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो. भारताला रोखण्‍याचा प्रयत्न काही देश करत आहेत. भारत सामर्थ्‍यशाली होऊ नये, असे प्रयत्न चालू आहेत.

४. कुटुंबाकडून मिळालेली व्‍यवहाराची शिस्‍त, परस्‍पर व्‍यवहारातील सद़्‍भावना आणि शालीनता, सामाजिक वर्तनात देशभक्‍ती आणि समाजाच्‍या प्रती असलेली आत्‍मीयता आणि कायद्याचे आणि राज्‍यघटनेचे पालन, या सर्व गोष्‍टी मिळून व्‍यक्‍तीचे वैयक्‍तिक आणि राष्‍ट्रीय चारित्र्य घडते.

५. देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि विकास सुनिश्‍चित करण्‍यासाठी चारित्र्याचे हे पैलू निर्दोष आणि परिपूर्ण असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. वैयक्‍तिक आणि राष्‍ट्रीय चारित्र्याच्‍या या सरावात आपण सर्वांनी सजग आणि सतत व्‍यस्‍त रहावे लागेल.