भारतीय अन्नव्यवस्था जगभरातील देशांत सर्वोत्तम !
‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ’ या जागतिक संस्थेची माहिती
ग्लँड (स्विट्झर्लंड) – जगभरात भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार मानला जातो. आता ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ’ (डब्ल्यू.डब्ल्यू.एफ्.) या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेने जारी केलेल्या ‘लिव्हिंग प्लॅनेट, २०२४’ नावाच्या अहवालामध्ये भारतीय अन्नव्यवस्था जगभरातील देशांपेक्षा पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम अन्नव्यवस्था असल्याचे म्हटले आहे. या अहवालात भारतातील अन्नव्यवस्थेची प्रशंसा करण्यात आली आहे. जगभरातील देशांमध्ये भारताचा अन्न वापराचा नमुना सर्वांत टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
१. जगभरातील सर्व देशांनी भारताच्या अन्नप्रणालीचा स्वीकार केला, तर वर्ष २०५० पर्यंत पृथ्वीवरील होणारी अन्नाची हानी मोठ्या प्रमाणात अल्प होईल, असेही या अहवालात म्हटले आहे.
२. भारतानंतर इंडोनेशिया, चीन, जपान आणि सौदी अरेबिया या देशांना सर्वोत्तम अन्नप्रणालींमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील आहारपद्धतींना सर्वांत निकृष्ट दर्जा देण्यात आला आहे.
३. जगभरातील सर्व देशांनी भारतातील अन्नव्यवस्था किंवा खाद्यपदार्थ स्वीकारल्यास वर्ष २०५० पर्यंत पृथ्वीवरील ८४ टक्के नैसर्गिक साधनसंपत्तीतूनच आपल्या आवश्यकता पूर्ण करता येतील. याचा अर्थ १६ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती वापरली जाणार नाही. त्यामुळे जागतिक तापमानवाढही अल्प होण्यास साहाय्य होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
संपादकीय भूमिकाभारतीय, म्हणजेच हिंदूंची अन्नव्यवस्थाच नाही, तर संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म आदी सर्व निसर्गानुकूल आणि आदर्शच आहेत. हे जेव्हा जग स्वीकारील, तेव्हा त्याच्यासमोर उभ्या असलेल्या सर्व समस्या दूर होतील, हे जाणा ! |