Donald Trump On India :  पुन्‍हा सत्तेत आलो, तर भारतावर दुप्‍पट कर लादणार !

  • डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचा इशारा

  • पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले !

डोनाल्‍ड ट्रम्‍प व पंतप्रधान मोदी

डेट्रॉइट (अमेरिका) – पुन्‍हा सत्तेत आल्‍यास भारतावर दुप्‍पट कर लादणार. भारत अमेरिकेच्‍या उत्‍पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावतो. त्‍यामुळेच ‘जशास तसे’ (रेसिप्रोकल) कर लावू, असे वक्‍तव्‍य अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी केले.

रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्‍प पुढे म्‍हणाले की, चीन २०० टक्‍के कर वसूल करतो, तर ब्राझिलही भरपूर कर आकारतो. असे असले, तरी प्रमुख देशांमध्‍ये भारत सर्वाधिक कर वसूल करतो. अमेरिकी लोकांना पुन्‍हा समृद्ध बनवण्‍यासाठी भारतावर कर लादणे आवश्‍यक आहे.

दुसरीकडे ट्रम्‍प यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करून भारतावरील कर लादण्‍याच्‍या टीकेची तीव्रताही अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्‍प म्‍हणाले की, आमचे भारतासमवेत, विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्‍यासमवेत विशेष संबंध आहेत. मोदी हे महान नेते आहेत. त्‍यांनी चांगले कार्य केले आहे.

ट्रम्‍प यांनी कर वाढवल्‍यास भारतावर काय होणार परिणाम ?


ट्रम्‍प यांनी भारतावरील कर वाढवल्‍यास वर्ष २०२८ पर्यंत भारताच्‍या सकल देशांतर्गत उत्‍पादनात ०.१ टक्‍क्‍यांनी घट होईल, असे अर्थतज्ञांचे मत आहे. यास जागतिक व्‍यापारात झालेली घट, तसेच भारत तुलनात्‍मकदृष्‍ट्या अन्‍य देशांसमवेतच्‍या  स्‍पर्धेत न्‍यून पडणे, हेही कारणीभूत असल्‍याचे तज्ञांचे मत आहे.