KSRTC Increase Dussehra Puja Expenses : कर्नाटक सरकारकडून बसगाड्यांच्‍या दसर्‍याच्‍या पूजेसाठीचे शुल्‍क १०० रुपयांवरून केले २५० रुपये !

बसचालक आणि वाहक यांची नाराजी दूर करण्‍यासाठी वाढवली तुटपूंजी रक्‍कम

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या (के.एस्.आर्.टी.सी.च्‍या) बसचालकांना दसर्‍याच्‍या दिवशी वाहनांमध्‍ये पूजा करण्‍यासाठी (आयुध पूजेसाठी) राज्‍य सरकारकडून प्रति वाहन १०० रुपये देण्‍यात येतात. या तुटपुंज्‍या रकमेवर बसचालक आणि वाहक नाराज होते. त्‍यामुळे के.एस्.आर्.टी.सी.ने आयुध पूजा खर्चाची रक्‍कम प्रति बस १०० रुपयांवरून २५० रुपये केली आहे. ‘के.एस्.आर्.टी.सी.’ने एका निवेदनात म्‍हटले आहे की, एका युनिटमध्‍ये १०० ते ५०० बसगाड्या आहेत. आयुध पूजेसाठी वर्ष २००८ पर्यंत प्रति बस १० रुपये देण्‍यात येत होते. वर्ष २००९ मध्‍ये ही रक्‍कम ३० रुपये प्रति बसगाडी करण्‍यात आली. वर्ष २०१६ मध्‍ये ५० रुपये प्रति बसगाडी, तर वर्ष २०१७ मध्‍ये ही रक्‍कम १०० रुपये प्रति बसगाडी करण्‍यात आली. परिवहनमंत्र्यांनी आयुध पूजेसाठी सध्‍याचे १०० रुपये प्रति बसगाडीचे शुल्‍क वाढवून २५० रुपये करण्‍याचे आदेश दिले आहेत. वर्ष २०२४ पासून सुधारित आदेश लागू करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हा कर्मचार्‍यांच्‍या तोंडाला पाने पुसण्‍याचा प्रकार आहे. एवढ्या तुटपूंज्‍या रकमेमध्‍ये पूजा साहित्‍य तरी मिळते का ? ‘आम्‍ही काही तरी करत आहोत’, हे लोकांना दाखवण्‍यासाठीच सरकारने तुटपूंजी रक्‍कम वाढवली आहे !