गेल्या काही मासांपासून घरफोड्या करणार्यांना कह्यात घेण्यात गोवा पोलिसांना यश !
सोन्याचे दागिने चोरणार्यांसह ते विकणारा आणि विकत घेणारा सोनार यांनाही अटक
पणजी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – गेल्या ६ मासांपासून गोव्यात चेहर्यावर मुखवटा घालून घरफोडी करणार्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अन्वेषण करतांना पर्वरी पोलिसांनी मारिया सांताना बाप्टिस्टा (वय ४४ वर्षे) नावाच्या संशयित व्यक्तीला अटक केली. तो बाणावली येथील आहे. तो आणि कालकोंडा-नावेली रस्ता, शिरवडे, मडगाव येथील त्याचा साथीदार महंमद सुफियान (वय २० वर्षे) यांना कह्यात घेण्यात आले होते. त्यांची सखोल चौकशी केली असता मारिया सांताना बाप्टिस्टा याने तो मुखवटा घालून फेब्रुवारी २०२४ पासून त्याचा मित्र महंमद सुफियान याच्यासमवेत वेगवेगळ्या भागांत रात्रीच्या वेळी घर फोडत असल्याचे मान्य करत चोरीचे सोन्याचे दागिने बाणावली येथील फिलिप राटो याच्याकडे सुपुर्द केल्याची स्वीकृतीही दिली. त्यानंतर चोरलेले सोन्याचे दागिने मडगाव येथे छोटे दागिन्यांचे दुकान असलेले सुवर्णकार समर पाल यांना विकले जायचे. त्यामुळे फिलीप राटो आणि समर पाल यांनाही पर्वरी पोलिसांनी शोधून अटक केली. ही माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ११ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत दिली.
मडगाव येथील दागिन्यांच्या दुकानाचे मालक दीपक बांदोडकर आणि आरोपी समर पाल यांच्याकडून एकूण ४४२ ग्रॅम चोरीचे वितळलेले सोने जप्त करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त चोरीला गेलेल्या १०० ग्रॅम सोन्याचाही माग काढण्यात आला असून ते योग्य वेळी परत मिळेल, असे सांगण्यात आले.
या गुन्हेगारांचा पर्वरी पोलीस ठाण्यातील ४, पणजी पोलीस ठाण्यातील ४, आगशी पोलीस ठाण्यातील २, म्हापसा पोलीस ठाण्यातील १, हणजुणे पोलीस ठाण्यातील २, फोंडा पोलीस ठाण्यातील ५ आणि जुने गोवे पोलीस ठाण्यातील १ प्रकरण, अशा १९ प्रकरणांत सहभाग आहे. पर्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विश्वेश कर्पे आणि पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली ही १९ प्रकरणे उघडकीस आली असून हा एक विक्रम आहे, असे कौतुकोद्गार पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या वेळी काढले.
गुन्हेगार मारिया सांताना बाप्टिस्टा याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. तो काही मास कारागृहातही होता. त्याच्यावरील काही प्रकरणांची सुनावणी न्यायालयांत चालू आहे आणि तो सध्या जामिनावर बाहेर आहे. या सर्व प्रकरणांत चोरी करणार्या २ जणांसह पुढे सोने विकणारा आणि चोरीचे दागिने विकत घेणार सोनार यांनाही पकडण्यात आले असल्याने सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीतील साखळी शोधून काढण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून येते.