म्हैसूर येथे चामुंडेश्वरीदेवीचे पूजन, मिरवणूक आणि प्रदर्शन !
भारतभरात सगळीकडेच दसर्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो; मात्र १० दिवस साजर्या होणार्या म्हैसूरच्या दसरा उत्सवाने ‘नाड हब्बा’ म्हणजे राज्योत्सव म्हणून पर्यटन नकाशावर स्थान मिळवले आहे. दसर्याच्या या उत्सवाचा प्रारंभ झाला, तो १४ व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या काळात ! शाही दसर्याचा हा सोहळा अत्यंत मनोहारी आणि नेत्रदीपक असतो. सजवलेल्या हत्तींवरून निघणारी देवी चामुंडेश्वरीची अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी नयनरम्य मिरवणूक, विद्युत् रोषणाईने झळाळून उठणारा म्हैसूरचा राजवाडा आणि इतर इमारती हा सोहळा पहाण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात.
‘जम्बो सवारी’ नावाने प्रसिद्ध असणारी ही शाही मिरवणूक म्हैसूरच्या दसर्याचे वैशिष्ट्य ! सजवलेले घोडे, हत्ती, उंट, बँड पथक आणि रंगीबेरंगी रेशमी कपड्यात सजलेले अन् नटलेले नगरजन अशा या मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे सोंड आणि पाठीवर जरतारी वस्त्रांनी सजवलेल्या हत्तीवरील २५० किलो वजनाच्या सोनेरी अंबारीतील चामुंडादेवीची भव्य अन् साजशृंगार केलेली मूर्ती !
म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरीच्या देवळातील चामुंडेश्वरी देवीच्या पूजनाने उत्सवास प्रारंभ होतो. देवीची मूर्ती अंबारीत ठेवण्यापूर्वी वडियार घराण्यातील राजदांपत्याकडून देवीची यथासांग पूजा होते. मिरवणुकीचा प्रारंभ म्हैसूरच्या राजवाड्यापासून होतो. शमीच्या झाडाजवळ त्या मिरवणुकीची सांगता होते.
महाभारतातील उल्लेखानुसार पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात त्यांची शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली होती, तसेच कोणत्याही मोहिमेवर निघण्यापूर्वी जयप्राप्ती व्हावी; म्हणून म्हैसूरचे राजे शमीच्या वृक्षाची पूजा करत असत. त्यामुळे शमीच्या वृक्षाजवळ मिरवणूक संपते. या वृक्षाजवळ मोठा मंडप उभारतात, त्याला ‘बनी मंडप’ म्हणतात.
या मंडपात पारंपरिक शस्त्रांची पूजा होते, मशालींचे संचलन होते. भारतीय सैन्यदलाच्या सैनिकांची थरारक प्रात्यक्षिके, पोलीस बँडचे वादन, शोभेच्या दारूची आतषबाजीही होते. दसर्याच्या संध्याकाळी म्हैसूरचा राजवाडा लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. म्हैसूरमधील अन्य ऐतिहासिक वास्तू, स्मारके, मोठी दुकानेही दिव्यांच्या रोषणाईने झगमगतात.
राजवाड्यासमोरील मैदानात भव्य प्रदर्शन भरवले जाते. अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध राज्यांतील गायक, वादक, नर्तक यांना कला सादर करण्याची संधी मिळते.
(साभार : दैनिक ‘सकाळ’)
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या कुल्लू शहरात दसर्याला लोक डोक्यावर देवतांची मूर्ती घेऊन थालापूर मैदानापर्यंत चालत जातात आणि श्रीरामाची पूजा करतात. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तेथे मेळेही भरवले जातात.
(संदर्भ : संकेतस्थळ)
मंगळूरू
मंगळूरूमध्ये लोक वाघासारखे कपडे परिधान करून नृत्य करतात. संपूर्ण समारंभामध्ये नाचगाणे ढोलाच्या थापावर केले जाते, तसेच संगीताची धून लावण्यात येते आणि दुर्गा अन् महागणपति यांच्या मूर्तींची शहरात मिरवणूक काढली जाते.
(संदर्भ : संकेतस्थळ)