भारतात विविध राज्यांमध्ये साजरा होणारा दसरोत्सव !
तमिळनाडू
‘गोलू’ किंवा ‘कोलू’ अशा नावाने दसर्याचा उत्सव साजरा होतो. या उत्सवात तेथे बाहुल्या सजवून ठेवण्याची पद्धत आहे. घरातील देवघरात लाकडाच्या ५, ७ किंवा ११ पायर्या बनवतात. त्या पायर्या रंगीबेरंगी कापडांनी सजवतात. त्यांना ‘गोम्बे हब्बा’ म्हणतात. पायर्यांच्या आजूबाजूची जागासुद्धा फुले आणि दिसे यांची आरास करून सजवतात. एकूण ९ बाहुल्या देवीच्या रूपात सजवतात. इतर बाहुल्यांमध्ये ९ दिवस प्रतिदिन याप्रमाणे देवीच्या रूपातील बाहुली नऊ पायर्यांवर ठेवतात. या देवीच्या रूपातील बाहुल्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात, अशी धारणा आहे.
या सणाच्या निमित्ताने सिद्ध केलेल्या बाहुल्या विवाहानंतर मुलीला दिल्या जातात. काही पायर्यांवर देवतांच्या छोट्या प्रतिकृती ठेवतात. सर्व देवतांनी स्वतःची शस्त्रे देवीदुर्गेला महिषासुराचा वध करण्यासाठी दिली होती.
या सर्वांचा आदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिकृती मांडल्या जातात. अगदी शेवटच्या पायरीवर मुले स्वतःची खेळणी सजवून ठेवतात. काहींच्या मते ब्रह्माने निर्मिलेली संपूर्ण सृष्टीच जणू तेथे अवतरते.
आंध्रप्रदेश
घरातील लहान मुले थोरांना नमस्कार करून एकमेकांना शमीची पाने देतात. महिला या दिवशी गौरीचे हळदी-कुंकू करतात, त्याला ‘बोम्यल कोलेवू’ म्हणतात. रंगीबेरंगी फुलांनी तबक सजवून त्यात मध्यभागी हळदीचा उभ्या आकाराचा गोळा किंवा भोपळ्याचे फूल ठेवतात. त्या तबकाची पूजा करतात आणि त्याभोवती फेर धरून नृत्य केले जाते. याला ‘बथकम्मा’ म्हणतात. दुसर्या दिवशी या बथकम्माचे विसर्जन केले जाते. अनेक ठिकाणी ‘तेप्पाउत्सवम्’, म्हणजे बोट उत्सव साजरा करतात. कृष्णा आणि तुंगभद्रा यांच्या संगमावर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तेथे फुले आणि दिव्यांची आरास केलेल्या बोटीत सजवलेली दुर्गेची प्रतिमा ठेवतात. ही बोट नदीतून नेतांना ती बघण्यासाठी लोक पुष्कळ गर्दी करतात.
आसाम
आसाममध्ये बिहूनंतर दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दसरा ! आसाममधील लोकांची अशी धारणा आहे की, दसर्याच्या दिवशी शंकराची पत्नी उमा प्रथम माहेरी आली. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना दसर्याच्या दिवशी माहेरी बोलावतात. इतिहासातील दाखल्यानुसार आसाममधील राजा प्रताप सिंग यांनी बंगाल येथील दुर्गापूजेविषयी पुष्कळ ऐकले आणि मूर्तीकला शिकण्यासाठी आसाममधून पश्चिम बंगालमध्ये माणूस पाठवला. आसाममध्ये दुर्गा पूजा चालू झाली. (साभार : दैनिक ‘सकाळ’)
केरळ
येथील ठक्केग्रामच्या प्रसिद्ध मंदिरात मूर्ती नसते, तर एक मोठा आरसा ठेवलेला असतो. दसर्याच्या दिवशी लोक त्यासमोर झुकून उभे रहातात आणि स्वतःचीच झुकलेली प्रतिमा बघतात. त्याचा अर्थ ‘देव आमच्यातही आहे’, असे मानणे.
दसर्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला लहान मुले देवळात, घरात किंवा शाळेत पुस्तकांची पूजा करतात. आपल्याकडे जशी लहान मुले दसर्याला पाटीपूजन करतात, तशी केरळातही शिकायला प्रारंभ करणारी मुले अक्षरे गिरवतात. त्याला ‘विद्याआरंभम्’ असे म्हणतात. एका ताटात तांदळाचे पीठ पसरून ठेवतात आणि मुले मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर बोटाने अक्षरे गिरवतात.
ओडिशा
येथे दसर्याच्या दिवशी शारदीय दुर्गा पूजा असते. दसर्याच्या दिवशीच्या पूजेला ‘अपराजिता पूजा’ असे म्हणतात. या दिवशी देवीला दहीपरवाल म्हणजे दही घालून केलेला भात, पिठा म्हणजे भाजलेला केक, मिठाई आणि तळलेला मासा यांचा नैवेद्य दाखवतात. लग्नानंतर मुलीला जसा निरोप देतात, तसा साश्रू नयनांनी देवीला निरोप देण्याचा कार्यक्रम असतो. मूर्तीचे विसर्जन केल्यावर लोक रावणाची प्रतिकृती जाळून ‘रावण पोडी’ साजरी करतात.
– प्रा. शैलेजा सांगळे (साभार : दैनिक ‘सकाळ’)
उत्तरप्रदेश
श्रीरामाच्या विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी किंवा दसरा साजरा करतात. श्रीरामाने रावणाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक बळ आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी ९ दिवस दुर्गामातेची आराधना केली होती. त्यामुळेच श्रीराम रावणाचा वध करू शकले, अशी त्या भागातील लोकांची धारणा आहे. बर्याच ठिकाणी रामलीलांचे आयोजन केले जाते. श्रीरामाच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित चित्रे रेखाटली जातात.
दसर्याच्या दिवशी उत्तरेकडील अनेक गावा-शहरांमध्ये रावण, त्याचा मुलगा मेघनाथ आणि भाऊ कुंभकर्ण यांच्या प्रचंड मोठ्या प्रतिकृतींमध्ये फटाके भरून मैदानात उभ्या करून त्या जाळतात. सुष्टाच्या अनिष्टावरील विजयाचे हे प्रतीक मानले जाते. अनेक ठिकाणी दसर्याच्या दिवशी होम करतात.
‘काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ, चिंता, अहंकार आणि दुष्ट विचार या ९ वाईट प्रवृत्ती जळून होमात नष्ट झाल्या’, असे मानले जाते. लोकांनी आपल्या वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात. सत्य आणि चांगुलपणा यांचा रस्ता धरावा, हाच होम करण्यामागचा हेतू असतो.
भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दसरा सण साजरा केला जात असला, तरी त्यामागील उद्देश वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणे आणि तो साजरा करणे असाच आहे, हे लक्षात घ्या ! |
विविध राज्यांमध्ये साजर्या केल्या जाणार्या दसर्याची माहिती आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे यांतून या सणाचा आनंद लुटूया अन् स्वतःतील आसुरी प्रवृत्तीचा नाश करून देवीचा कृपाशीर्वाद संपादन करूया ! |