भारतियांचे सीमोल्लंघन !
१. भारताचा इतिहास सीमोल्लंघनाचा आहे !
‘पाश्चात्त्य देशांचे सीमोल्लंघन पहाता त्यांनी स्वतःची मूळ संस्कृती गमावल्याचे लक्षात येते. याउलट भारतावर आक्रमणे झाली असली, तरी प्रत्येक आक्रमणाला तोंड देऊन ते जिंकण्यात आले. आपल्या पूर्वजांनी दसर्याचे महत्त्व ओळखले, शस्त्र बाळगले, पाजळले आणि गाजवले; म्हणूनच भारताचा इतिहास बाहेरच्यांनी केलेल्या आक्रमणांचा नसून आपल्या विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास सीमोल्लंघनाचा आहे. विशेष असे की, आपले सीमोल्लंघन राज्य करण्यासाठी नव्हते, तर ते ज्ञानदायक ठरले.
२. सीमोल्लंघनाची आवश्यकता !
दसर्याचा सण शस्त्रपूजन, शौर्य गाजवणे आणि सीमोल्लंघन यांचा आहे. पुष्कळ पूर्वीपासून भारतियांनी ही रीत पाळली आहे. अगदी वैदिक काळापासून किंवा कदाचित् त्याच्या आधीपासूनसुद्धा ! ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ अर्थात् ‘विश्वाला सुसंस्कृत कर’, असे ऋग्वेदाने सांगितले आहे. विश्वातील सर्वांना शीलवान, दयावान, चारित्र्यवान, श्रेष्ठ करायचे असेल, तर त्यासाठी सीमोल्लंघन करणे आवश्यक होते. सामान्य लोक मग ते व्यापारी असोत, श्रमिक असोत, वैज्ञानिक असोत अथवा गणितज्ञ असोत, जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी भारतातून नेलेले ज्ञान, विज्ञान, कथा, रामायण, महाभारत, शून्य इत्यादी रूपांतील सोने लुटले; पण हा इतिहास आपल्याला ठाऊक नाही.
३. शौर्य गाजवण्याची अव्याहत परंपरा !
भारतावर आक्रमणे झाली खरी; पण प्रत्येक आक्रमणाला तोंड देऊन ते जिंकण्यात आले. वैदिक राजा सुदासने मध्य आशियातून आक्रमण करणार्या १० राजांना हरवले. पुढे राजा पुरूने सिकंदरला ग्रीसला परतण्यास भाग पाडले. विक्रमादित्य आणि गौतमीपुत्र सातकर्णीने शकांना हरवले. स्कंदगुप्त, नरसिंहगुप्त आणि यशोधर्म आदी राजांनी हूणांना परतवून लावले. मराठे आणि नंतर शीख यांनी मोगल साम्राज्य संपुष्टात आणले. शेवटी युरोपीयन शक्तींनासुद्धा आपण परतवून लावले. प्रत्येक वेळी त्या त्या पिढीने शस्त्र पाजळले, लढले; म्हणून भारतात आजही सहस्रो वर्षे जुन्या प्रथा-परंपरा चालू आहेत. आपली नावेसुद्धा जुन्या परंपरा आणि भाषा यांनुसार आहेत. येथील देव, धर्म, भाषा, परंपरा, प्रथा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, पंचांग, वस्त्र, दागिने, चपला, केशभूषा, खाद्यपदार्थ यांत जुना धागा अव्याहतपणे चालू आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक पिढीला शौर्य गाजवावे लागते. ‘दसरा’ हा सण त्याचीच आठवण करून देतो. प्रत्येक वर्षी शस्त्रपूजा करायची, शस्त्र चालवायची रीत त्यासाठीच आहे.
आपल्या पूर्वजांनी दसर्याचे महत्त्व ओळखले, शस्त्र बाळगले, पाजळले आणि गाजवले; म्हणूनच भारतावर झालेली आक्रमणे अयशस्वी ठरली. त्यामुळे भारताचा इतिहास हा बाहेरच्यांनी केलेल्या आक्रमणांचा इतिहास नसून आपल्या विजयाचा इतिहास आहे.
४. भारतातील ज्ञानदायक सीमोल्लंघन !
भारताचा इतिहास सीमोल्लंघनाचा आहे. भारतातील सामान्य नागरिक, साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे हिमालय अन् समुद्र यांच्या सीमा ओलांडून परदेशात पोचले. अनेक ब्राह्मण, श्रमण, राजे, राजपुत्र, राजकन्या, व्यापारी, कारागीर, कामगार, शेतकरी यांनी सीमोल्लंघन केले. त्यांच्या समवेत भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, न्याय, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पद्धती यांचे ज्ञान युरोपपासून व्हिएतनामपर्यंत पोचवले. यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित होते की, आपले सीमोल्लंघन ज्ञानदायकच ठरले.
५. भारतीय दशमान पद्धत
दशमान पद्धत जगात सर्वत्र वापरली जाते. वेळ, ताप, अंतर, वजन, गती, उंची, तसेच योग, प्राणायाम, आयुर्वेदिक औषधांची पातळी, पावसाचे प्रमाण, लोकसंख्या मोजायला ही पद्धत वापरली जाते. युरोपीय, चीन आणि आग्नेय आशियाई देशात भारतीय शब्द वापरले जातात. अनेक देश भारतीय लिपीतून सिद्ध केलेल्या लिपी वापरतात. हे सोने भारतियांनी जगाला वाटले. विवेकानंद केंद्राने प्रकाशित केलेल्या ‘देश-विदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ या पुस्तकातून मी अशा सोन्याच्या पानांचा आढावा घेतला. आपले सीमोल्लंघन अशा शुभचिन्हांतूनच उमटले आहे.
आजही अनेक भारतीय शिकण्यासाठी किंवा कामानिमित्त परदेशात जातात, तसेच सीमोल्लंघन करतात. त्यांनी भारताचा उज्ज्वल इतिहास समजून घ्यावा. भारतीय संस्कृतीतील औदार्य आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञान शिकावे. ती सोन्याची पाने सोबत न्यावीत आणि ताठ मानेने अन् मुक्त हस्ताने वाटावे !’
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’)