पुणे येथे शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार !
अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद !
पुणे – येथील लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार करण्यात आले. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी अन्य एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. लष्कर भागातील एका शाळेच्या प्रसाधनगृहाच्या आवारात ही घटना घडली. शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेली जागृती, तसेच समुपदेशनामुळे बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना वाचा फुटली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गेल्या ९ महिन्यांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ३५९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पीडित मुलगा शाळेच्या आवारातील प्रसाधनगृहात गेला होता. तेव्हा शाळकरी मुलाने त्याच्यासमवेत अनैसर्गिक कृत्य केले. मे महिन्यापासून मुलगा त्याच्यावर अत्याचार करत होता. अत्याचारांमुळे घाबरलेल्या मुलाने पालक, तसेच शाळेतील शिक्षक यांना याविषयीची माहिती दिली.