दसर्याच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांच्या संदर्भात केला जाणारा अपप्रचार आणि खंडण !
१. टीका : दसर्याच्या दिवशी आपट्याची पाने तोडू नका. अशा प्रकारे पाने तोडून निसर्ग ओरबाडला जात आहे.
खंडण : तारतम्य ठेवून एखाद्या झाडाची छाटणी केली, तर झाडाची कोणतीही हानी होत नाही. आपट्याच्या झाडाचे तर नाहीच नाही; कारण ते झाड खूप मोठे असते. काही दिवसांनी पाने परत येतात. किंबहुना हे सगळ्याच झाडांच्या संदर्भात शास्त्रीय सत्य आहे. आपट्याला आता कोवळी नुकतीच फुटलेली पालवी नाही. आता पाने जून झाली. अर्धामुर्धा पाला कापला, तर झाडे अधिकच आटोपशीर वाढतील. पानांच्या कचर्याचाच प्रश्न असेल, तर आपट्याची पाने हे उत्तम खत आहे. दुसर्या दिवशी टाकून देण्याऐवजी आपल्या कुंडीत पाने रिचवा.
छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात् पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले ! त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी; कारण पुढे येणार्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते. ही माहिती आपल्या पूर्वजांनाही होती; म्हणूनच ‘पाने वाटल्याने निसर्गाची कोणतीच हानी होणार नाही, उलट त्या झाडांचे संरक्षण होईल, अशा रितीने ही परंपरा जपली असावी; परंतु पुस्तक वाचून स्वतःला तत्त्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरणवादी एरव्ही वृक्षतोड होतांना बघत बसतात; पण आपल्या सण-उत्सवांच्या वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते. एरव्ही सहस्रो वृक्षतोडीची प्रकरणे घडतात; पण तक्रार द्यायला हे लोक पुढे येत नाहीत.
आपटा ही औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. आपट्याची पाने औषधी असतात. आपट्याच्या झाडाला येणार्या शेंगांच्या बिया, तसेच फुले आणि झाडाची साल यांचा औषध म्हणून अन् विविध औषधी घटक म्हणून सर्रास वापर केला जातो. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. ज्या झाडांपासून डिंक मिळवला जातो, त्यात आपट्याच्या झाडाचाही समावेश आहे. या झाडापासून टॅनिन मिळवतात. मग असे सर्व लाभ असतांना हे सगळे बंद का पाडायचे ?
– श्री. मंदार दिलीप जोशी, पुणे
२. टीका : ईदच्या दिवशी बिर्याणी खाऊन झोपलेले ‘पर्यावरणप्रेमी’ आता जागे होतील आणि सांगतील की, दसर्याला आपट्याची पाने वाटून झाडांची नासाडी करू नये. यातून वातावरणातील ओझोनचा थर अल्प होईल.
खंडण : ज्या वृक्षांचा आपले कोणतेच सण किंवा देवता यांच्याशी संबंध नाही, असे भारतातील सहस्रो वृक्ष आज नष्ट झालेले आहे. वड, पिंपळ, उंबर हे वृक्ष केवळ देवतांशी संबंध जोडलेला असल्यानेच टिकून आहेत. अन्यथा ते कधीच नष्ट झाले असते; कारण अशा झाडांची लागवड मुद्दामहून कुणीच करत नाही.
ज्या लोकांना वाटते की, एखाद्या झाडाची पाने तोडल्यावर झाड नष्ट होईल, मुळात ते लोक आपले वनस्पती शास्त्राविषयीचे अज्ञानच प्रकट करत आहेत. झाडाची जोपासना करतांना अथवा बागायत करतांना बर्याच वेळा झाडाची काही पाने अथवा फांद्या छाटाव्याच लागतात. तेव्हाच ते झाड नव्या जोमाने बहरते; पण या लोकांचा कोणत्याच विषयाचा अभ्यास नसल्याने आणि केवळ सण अन् हिंदु धर्म यांना विरोध करायचा असल्याने असे संदेश प्रसारित केले जातात.
आपट्याची पाने विक्रीसाठी आणणारे लोक हे एक तर गरीब शेतकरी असतात किंवा गरीब आदिवासी असतात. हे झाड त्यांना वर्षातून एकदा का होईना, पैसे मिळवून देणारे असते. त्यामुळे ते लोकही हे झाड जगण्याची काळजी घेतात. सोने वाटायचे बंद झाले, तर मात्र या लोकांच्या दृष्टीने हे झाड निरुपयोगी ठरेल.
पर्यावरणाची काळजी असेल, तर झाडे लावावीत. त्याला कुणीही अडवत नाही; पण अशा परंपरा नष्ट करू नका. ज्यांना खरोखरच पर्यावरणाची किंवा आपट्याच्या झाडाची फिकीर आहे, त्यांनी या वर्षीपासून नवीन उपक्रम राबवावा आणि प्रतिवर्षी दसर्याला आपट्याचे एक झाड लावावे.
– श्री. उत्तम गावडे, बेळगाव